लोकसत्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील गेवराईपासून १५ किलोमीटरवरील अर्धमसला गावात रविवारी पहाटे एका प्रार्थनास्थळात स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार स्फोट हा जिलेटिन कांड्यांचा असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी तक्रार दाखल असून, त्यावरून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी “लोकसत्ता”शी बोलताना दिली.
अर्ध मसला गावात शनिवारी रात्री एक धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान दोन संशयितांनी काही आक्षेपार्ह हावभाव करून शिवीगाळही केली. मात्र त्यावेळी प्रकरण मिटवण्यात आले. मात्र पहाटेच्या सुमारास स्फोट झाला त्यावेळी दोन्ही संशयित घटनास्थळावरून पळून जाताना आढळून आल्याचे यासंदर्भाने दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्फोट झाला त्या स्थळ व परिसराची पाहणी केली. संशय ज्यांच्यावर व्यक्त करण्यात आला त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.