स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशींपकी हमीभाव देण्याची शिफारस राज्य सरकारने मान्य करायला हवी. त्याचबरोबर राज्यातील दुष्काळाची भीषण स्थिती पाहता, यंदा सातव्या वेतन आयोगाची रक्कम राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
जिल्ह्यातील अणदूर येथे हॅलो मेडिकल फौंडेशन आणि नाम संस्थेच्या वतीने एकल महिला मेळावा, तसेच शेतकरी कुटुंबांना आíथक मदत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पाटेकर बोलत होते. अभिनेते मकरंद अनासपुरे, संस्थेचे संचालक केशवर आघाव, मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, सोलापूरच्या युनिटी मल्टीकॉनचे कार्यकारी संचालक रफिल मोलवी आदी उपस्थित होते. मेळाव्यात ५० विधवा महिलांना प्रत्येकी दोन शेळ्या, ३५ महिलांना शिवणयंत्रे व १०० गरीब मुलींना शाळेला जाण्यासाठी सायकलचे वाटप करण्यात आले. आशियाई खो-खो स्पध्रेत सुवर्णपदक पटकावणारी कर्णधार सारिका काळे व वडिलांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या विशाल तानाजी भागुडे या विद्यार्थ्यांचा नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला.
नाना पाटेकर म्हणाले की, सर्वानी एकत्र येऊन पक्षविरहित व धर्मविरहित काम करावे. जाती, धर्मात भांडणे लावण्याचे काम राजकारण्यांनी केले. नाम संस्थेला आतापर्यंत २९ कोटी रुपये लोकांनी दिले आहेत. लोकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम संस्था करीत आहे. वेदना सहन करण्याची ताकद वाढविली तर वेदना आपोआप नाहीशा होतात. संकटातून मार्ग म्हणून शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळ, पशाची बचत होऊन चांगले उत्पन्न वाढल्याची उदाहरणे आहेत. शेतकऱ्यांनी यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयावह आहे. त्यामुळे या जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करावयाची आहेत. लोकांनी स्वयंस्फूर्तीने काम केले तर प्रत्येक काम यशस्वी होणार आहे. आमच्यासाठी उद्योगपती अंबानी यांनी दिलेले एक हजार कोटी महत्त्वाचे नाहीत, तर आपल्या माणसांनी दिलेला एक रुपया आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्व समस्यांच्या मुळाशी जाऊन काम करायचे आहे. कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता नाम संस्थेचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. हॅलोचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी यांनी प्रास्ताविक, तर बसवराज नरे यांनी सूत्रसंचालन केले.
एक कोटी रोपे लावणार
जुल महिन्यात वृक्षदिन साजरा करायचा आहे. त्या वेळी दुष्काळग्रस्त भागात एक कोटी रोपे लावण्याचा संकल्प नाम संस्थेने केला असल्याचे अनासपुरे यांनी सांगितले. नाम संस्थेच्या वतीने नळदुर्ग येथील बोरी नदीच्या पात्रातील गाळ काढण्याबरोबरच नदीपात्राचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम करण्यात येणार असल्याचे पाटेकर यांनी जाहीर केले. या कामासाठी युनिटी मल्टीकॉन कंपनीचे रफिल मोलवी यांनी चार पोकलेन यंत्र दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader