दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारी टोळीचे कंबरडे मोडून राज्य सुरक्षित केले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला फरफटत भारतात आणण्याचे मुंडे यांचे स्वप्न आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने पूर्ण करू, अशी ग्वाही देतानाच लोकांच्या प्रेमातून उभारलेल्या गोपीनाथगडावर दरवर्षी १२ डिसेंबरला सबंध महाराष्ट्र येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
जिल्ह्य़ातील परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या गोपीनाथगडाचे उद्घाटन शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. मुंडे यांच्या २२ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण या वेळी करण्यात आले.
गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच राज्यात सत्तापरिवर्तन झाले, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री असताना मुंडे यांनी मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमला फरफटत भारतात आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाची प्रतिमा बदलत असून संयुक्त राष्ट्रसंघात पूर्वी भारताचे पंतप्रधान पाकिस्तानविरुद्ध जाऊन तक्रार करीत. आता पाकिस्तान भारताविरुद्ध तक्रार करीत आहे. त्यामुळे मुंडे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मोदी यांच्या मदतीने पूर्ण करून दाऊदला भारतात आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. जीवनात जेव्हा अडचण येईल तेव्हा गोपीनाथगडावर येऊन प्रेरणा घेऊ, असेही फडणवीस यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ग्रामीण विकास संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शंभर एकर जमीन देण्यात आली. ऊसतोडणी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना कौशल्य विकास व इतर सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंडे यांच्यामुळेच भाजपला महाराष्ट्रात वैभव मिळाले. गरीब, मजूर, उपेक्षित समाजासाठी त्यांनी कायम संघर्ष केला. त्यामुळे गोपीनाथगड हे स्थळ गरीब माणसाला संघर्षांची व सत्ताधाऱ्यांना उपेक्षितांसाठी काम करण्याची प्रेरणा देईल, अशी अपेक्षा अमित शहा यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री, प्रज्ञा मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील भाजप-शिवसेनेचे मंत्री, घटक पक्षांचे नेते, राज्यभरातून मुंडे समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शरद जोशींचे विस्मरण!
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे सकाळी निधन झाले. दुपारी गोपीनाथगडाच्या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, माजी आमदार पाशा पाटेल यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री, १८ मंत्री, नेते आवर्जून उपस्थित होते. मात्र, शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या जोशी यांच्या निधनाबाबत कार्यक्रमात शब्दही उच्चारला गेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा