धनगर समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
धनगर समाज विकास परिषदेचा महामेळावा रविवारी माळेगाव येथे पार पडला. खासदार संजय जाधव, आमदार अनिल गोटे, हेमंत पाटील, तुषार राठोड, सुधाकर भालेराव, सुभाष साबणे, माजी आमदार गोविंद्र केंद्रे, विजय गव्हाणे, संयोजक भाजप प्रवक्ते गणेश हाके, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राजेश पवार, जि. प. चे माजी अध्यक्ष संभाजी धुळगंडे, आरक्षण समितीचे विकास म्हात्रे, डॉ. अजित गोपछडे, माजी महापौर सुधाकर पांढरे आदी उपस्थित होते.
धनगर समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. भावना महत्त्वाची असली तरी संविधान श्रेष्ठ आहे. कायद्याच्या चौकटीत राहून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केंद्राकडे शिफारस करण्यात आली आहे. मागील सरकारने मात्र या समाजासोबत बेईमानी केली. समाजाला झुलवत ठेवले. ते आता भूलथापा देत आहेत. आम्ही सर्व पुरावे आणि अहवाल सादर करून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या प्रयत्नात आहोत. मराठवाडय़ात दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याची ताकद मिळावी, तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या साठी आपण खंडोबाला साकडे घातले आहे, असेही त्यांनी सांगितले. या पूर्वीच्या सरकारने पाठविला तो अहवाल खोटा होता. त्याचा आम्ही शिरच्छेद केला. संविधानानुसार समाजाला आरक्षण देण्यास आमचे प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
माळेगाव यात्रेला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचे अश्व येथे येत. घोडे, उंट, गाढव यांच्या शर्यती येथे होतात. भटक्यांची जातपंचायत येथे होते. रोटी-बेटीचे व्यवहार येथे होतात, ही समाधानकारक बाब आहे. राजकारणात गाढवांच्या शर्यती तर रोजच्याच आहेत. परंतु येथील गाढवांची शर्यत ही दिलासा देणारी असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी करताच हशा पिकला.
आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ५ कोटींचा निधी द्यावा, तसेच लिंबोटी धरणाच्या उर्वरित कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली. धनगर समाजाच्या परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांचा घोंगडी-काठी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तब्बल तीन तास उशिराने आलेल्या मुख्यमंत्र्यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच गोविंद धुळगंडे, उपसरपंच सुंदराबाई धुळगंडे, विजय वाघमारे यांनी सत्कार केला व निवेदन दिले. राजेश पवार यांचा वार्षिक कार्यअहवाल, तसेच अहल्यादेवी दिनदर्शिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
नांदेडात थंड स्वागत
मुख्यमंत्री फडणवीस पूर्वनियोजित दौऱ्यानुसार सकाळी १० वाजता विमानाने नांदेडात येणार होते. मात्र, तब्बल ३ तास उशिराने दुपारी १ वाजता त्यांचे आगमन झाले. विशेष म्हणजे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपचा एकही पदाधिकारी वा स्थानिक नेता उपस्थित नव्हता. आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मनपा आयुक्त सुशील खोडवेकर, विरोधी पक्षनेते बाळू खोमणे यांनी विमानतळावर स्वागत केले. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने माळेगाव यात्रेला रवाना झाले.

Story img Loader