औरंगाबाद : बनावट कागदपत्रे आणि जमीन हस्तांतरणप्रकरणी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या मंठा शाखेची ४९ लाख ९८ हजार ४१५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंधळे कुटुंबातील सात जणांच्या विरोधात बॅंकेने मंठा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी केंधळे कुटुंबातील सर्वावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. कागदपत्रात फेरफार करणे, त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे रक्कम हडप करणे, बनावट कागदपत्रे खरी आहेत असे भासवून कर्जाची रक्कम उचलणे आदी आरोप या सर्वावर ठेवण्यात आले असल्याची माहिती बॅंकेच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
सुनील सीताराम केंधळे, भारत सीताराम केंधळे, चंद्रकांत सीताराम केंधळे, अंजली सुनील केंधळे, लीलावती सीताराम केंधळे, मंगल पंजाब केंधळे, पंजाब सीताराम केंधळे (राहणार केंधळे पोखरी, मंठा, जिल्हा-जालना) अशी आरोपींची नावे आहेत. बॅंकेने वसुलीसाठी पाठपुरावा सुरू केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी बॅंकेने या कुटुंबाच्या तारण जमिनीचा शोध घेतला असता ही फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर बॅंकेच्या व्यवस्थापकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. कोणत्याही शेतजमिनीवर कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परतफेड करेपर्यंत ७-१२ उताऱ्यात फेरफार करता येत नाही. तसेच तारण जमीन विकताही येत नाही. परंतु तरीही असे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना सुरू केली आहे. थकीत शेतकरी कर्जदारांना सुलभ आणि व्याजात सवलत देऊन या योजनेद्वारे कर्जफेड करून पुन्हा कर्ज घेता येते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले थकीत कर्ज नियमित करून घ्यावे, असे आवाहनही बॅंकेने या पत्रकात केले आहे.