जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे मागच्या झेंडावंदनाला आले. त्या वेळी त्यांनी टंचाईबाबत धावती बठक घेतली. बुधवारीही त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बठकीचे आयोजन केले होते. मात्र, ते रात्री उशिरापर्यंत आलेच नाहीत. यावरून कांबळे यांच्या लेखी टंचाईला किती महत्त्व आहे, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
जिल्हा दुष्काळात होरपळून निघत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र चालूच आहे. मागील दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे टंचाईबाबत ओरड कमी झाली असली, तरी भविष्यात मात्र स्थिती गंभीर राहणार असल्याचे चित्र आहे. पालकमंत्री झेंडावंदनाशिवाय जिल्ह्यात यायचे नावच घेत नाहीत. त्यामुळे टंचाईकाळात प्रशासनाची मनमानी चालते. गेल्या वर्षी हाच अनुभव आल्याने टंचाईची कामे मंजूर होत नसत. मंजूर झाल्यावरही कामे झाली नाहीत. पाणीपुरवठा विभागात प्रमुखही नाही, जीवन प्राधिकरणचेही हेच चित्र आहे.
पालकमंत्र्याचा जिल्हा दौरा जाहीर झाला. शहरात दुपारी १ वाजता त्यांचे आगमन होणार होते. टंचाई बठकीची वेळ दुपारी तीनची होती. परंतु लोकप्रतिनिधींना दिलेल्या अधिकृत पत्रामध्ये बठकीची वेळ साडेचारची होती. नव्याने आलेल्या सुधारित दौऱ्यात त्यांचे आगमन जिल्हाधिकारी कार्यालयात संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी होऊन साडेपाचला टंचाई आढावा घेणार असल्याचे अधिकृत दौऱ्यात नमूद केले होते. दिलेल्या वेळेप्रमाणे दुपारी चारपासून जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांची प्रतीक्षा करीत होते. सुधारित दौऱ्याची कल्पना काही अधिकाऱ्यांना मिळाल्याने ते साडेपाचच्या सुमारास कार्यालयात दाखल झाले. मात्र, पालकमंत्र्यांचे आगमन शहरात झालेच नव्हते. साहजिकच नियोजित टंचाई बठक जिल्हाधिकारी गगराणी यांनीच घेतली. पालकमंत्री उशिरा येणार असल्याने जिल्हाधिकारी टंचाई बठक घेतील व पालकमंत्र्यांना अहवाल सादर करतील, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्तुळात होती.

Story img Loader