सततच्या दुष्काळाचे मळभ काही क्षणासाठी दूर सारून वर्षांतील सर्वात मोठय़ा सणाची, दिवाळीच्या आनंदाची अनुभूती घेण्यासाठी सारेच मोठय़ा उत्साहाने सरसावले आहेत. रविवारी दिवसभर शहरातील रस्त्यांवर उसळलेल्या गर्दीच्या साक्षीने उत्सवी आनंदानिमित्त खरेदीला मोठे उधाण आले होते. गुलमंडी, सिडको कनॉट प्लेससह सर्वच प्रमुख ठिकाणच्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानीच रविवारची सुट्टी वेगवेगळ्या खरेदीने साजरी केली. तयार कपडय़ांपासून फटाके, मिठाई, फराळाचे तयार पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनांच्या खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली होती. किराणा, तसेच दागिन्यांच्या दुकानांमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र होते. दिवाळीच्या पर्वाला उद्या (सोमवारी) धनत्रयोदशीने प्रारंभ होत आहे. शनिवारी वसुबारसेला पारंपरिक उत्साहाने भक्तिभावाने गायींचे पूजन करण्यात आले. रस्त्यांवर ग्राहकांच्या प्रचंड गर्दीमुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक होत होती. मात्र, सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Story img Loader