दुकान परवाना, आयकर विवरण पत्र, बँक खात्याच्या उता-यांसह इतर बनावट कागदपत्रे सादर करुन त्याआधारे एचडीएफसी बँकेकडून लाखो रुपयांचे कर्ज उचलून त्याची परतफेड न करता चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सात जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी त्यापैकी चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मोहंमद मजाजुद्दीन सिद्दीकी मोहंमद मतीनोद्दीन मोहंमद सिद्दीकी (२७, रा. चेलीपुरा), शेख जावेद खलील कालु पटेल शेख (२७, रा. अंबेलोहळ, ता. गंगापुर) आणि खान आसेफ गुलाब चांद खान (४३, रा. प्लॉट क्र. २७२, शहानगर, बीड बायपास रोड) शेख उबेद शेख हुसेन (२८, रा. जहांगीर कॉलनी, रेल्वे स्टेशन रोड) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत.

व्यावसायिक कर्जासाठी दुकान परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड, विजेचे बील, आयकर विवरण पत्र, बँक खात्याचा उतारा यासह बनावट सह्या शिक्के व कागदपत्रे सादर करुन सात जणांनी एचडीएफसी बँकेच्या पद्मपुरा शाखेतून ५ नोव्हेंबर २०१६ ते २० जुलै २०१७ या काळात ६७ लाख ८५ हजार ६४२ रुपयांचे कर्ज उचलले. या कर्जाची परतफेड होत नसल्याने बँकेचे लोकेशन मॅनेजर गोरक्षनाथ श्रीराम डिगुरकर (३४, रा. प्लॉट क्र. ५, गट क्र. २७, शिल्पनगर, सातारा परिसर) यांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठून तक्रार दिली. याप्रकरणाच्या चौकशीत सातही जणांनी एचडीएफसी बँकेला सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. त्यावरुन मंगळवारी सकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी सात जणांविरुध्द डिगुरकर यांच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर लगेचच शोध घेऊन चौघांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई उपनिरीक्षक खंडागळे, जमादार सुनील फेपाळे, प्रकाश काळे, नितेश घोडके, मनोज ऊईके आणि जयश्री फुके यांनी केली.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता…….
यातील सातही जणांनी दुकाना थाटण्याचे कारण पुढे करुन बँकेकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. खान आसेफ याने ३ मे २०१७ रोजी १२ लाख ५९ हजार ४६९ रुपये, उबेद हुसेनने ११ मे २०१७ रोजी ९ लाख ६४ हजार २३ रुपये, मोहंमद मजाजुद्दीनने ९ जुन २०१७ रोजी ९ लाख ८७ हजार पाचशे रुपये तर शेख जावेद खलीलने ५ डिसेंबर २०१६ रोजी ४ लाख ८२ हजार ८९ रुपयांचे कर्ज घेतले आहे. यासह अन्य तिघांनी देखील कर्ज घेतले आहे. कर्जासाठी कागदपत्रे तयार करुन देणा-या व्यक्तिने या कर्ज मंजूर होताच बनावट कागदपत्रे तयार करुन दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून दोन लाख रुपये घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Story img Loader