|| बिपीन देशपांडे

आरोग्य विभागाचे अठरा वर्षांतील निरीक्षण

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रीय माणसाचे आयुष्यमान वाढले आहे. २००० सालापूर्वी महाराष्ट्रीय व्यक्तीचे आयुर्मान ६४ र्वषे होते. ते आता गेल्या अठरा वर्षांत ७१ वर्षांपर्यंत वाढले आहे. सरकारी यंत्रणांच्या २००० ते २०१८ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उपलब्ध झाली आहे. वेगवेगळ्या आजारांना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, आरोग्याबाबतच्या जनजागृतीचा परिणाम असून आयुष्यमान आणखी वाढणार असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

देश स्वतंत्र झाला तेव्हा देशातील माणसांचे सरासरी आयुष्यमान हे अवघे ३७ वर्षांचे होते. त्याकाळी प्लेग, कॉलरा, देवी यांसारख्या रोगाने गावच्या गावे प्रभावित व्हायची. यात लहान ते तरुण मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक असायची.त्यावर उपाय सुरू झाले. आरोग्याबाबत जनजागृतीही होऊ लागली. परिणामी २००० सालापर्यंत महाराष्ट्रीय माणसाचे आयुष्यमान ६४ वर्षांपर्यंत वाढले. त्यानंतरही सरकारी पातळीवरून मातामृत्यू, बालमृत्यू, साथीचे आजार, संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा काम करू लागली. त्यामुळे आता आयुष्यमान ८० पर्यंतचे असले तरी वय वर्षे शून्यच्या आतील बालकांपैकी एकाचा जरी मृत्यू झाला तरी सरासरी कमी होते. आयुष्यमानाची ही सरासरी ७१ वर्षांपर्यंतची आली असून, आणखीही आयुष्यमान वाढू शकणार आहे, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले.

दहा वर्षांपूर्वी मातामृत्यू दर १२३ पर्यंतचा होता. म्हणजे २० ते २५ वयातील महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू व्हायचा. मातामृत्यू दर आता ६१ पर्यंत आला आहे. शून्य ते १ वर्षांपर्यंतच्या काळात मृत्यू येणाऱ्या बालकांच्या संख्येचे प्रमाण ३९ पर्यंत होते. आता हे प्रमाण १९ वर आले आहे. कावीळ, टीबी, गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारावरही तातडीने नियंत्रण आणले जाते किंवा त्याबाबत आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून खबरदारी घेतली जाते. या शिवाय वैद्यकीय क्षेत्रात मूत्रपिंड, हृदय प्रत्यारोपण, मेंदू मृत झालेल्या व्यक्तींचे अवयवदान करण्याविषयीही जागरूकता आणली जात असून त्यामुळे आयुष्याला नवसंजीवनी मिळत असल्याचे  अधिकारी सांगतात.

आयुष्यमान आणखीही वाढू शकते

सरकारी यंत्रणेकडून आरोग्याबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर जनजागृती केली जाते. विविध आरोग्य सेवा पुरवण्याबाबतही काळजी घेतली जाते. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रीय माणसाचे आयुष्यमान ६४ वरून ७१ पर्यंत वाढले आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते.    – डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक, औरंगाबाद.

Story img Loader