मराठवाडय़ातील २० तालुक्यांत गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस बरसला. विभागातील २० तालुक्यांत अतिवृष्टी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दुधना नदीला आलेल्या पुरामुळे सकाळी फुलंब्री तालुक्यात ६२ जण अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. जालना जिल्हय़ातील भोकरदन तालुक्यातील जुई नदीला आलेल्या पुरात सचिन हिरे (वय २०) हा तरूण वाहून गेला.
सायंकाळी सातपर्यंत बोट पाठवून आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी या सर्वाना सुखरूप वाचविले. औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसावंगी येथील मंदिरावर सायंकाळपर्यंत दोघेजण अडकले होते. उशिरा त्यांनाही सुखरूप वाचविण्यात आले.
गुरुवारी रात्री दमदार बरसलेल्या पावसात सिल्लोड तालुक्यातील वसई येथे वीज पडून दोनजण जखमी झाले. अनेक ठिकाणी घरे पडली. दुधना नदीस आलेल्या पुरामुळे सेलूद व चारठाण ही गावेही धोक्याच्या पातळीवर होती. तेथील ५०० जणांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. गेल्या ३० वर्षांत प्रथमच असा पाऊस झाला. या पावसामुळे प्रचंड आíथक नुकसान झाल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. प्रशासनाने आपत्तीजनक स्थिती जाहीर करून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द केल्या आहेत.
गुरुवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यांस पावसाने झोडपले. दुधना नदीला पूर आल्याने लगतचे मध्यम प्रकल्प भरले. सिल्लोड, खेळणा, केळगाव, उंडणगाव, निल्लोड हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले. दुधना नदीने वळसा घातलेल्या औरंगपूर येथे ५० जण अडकले. त्यांना वाचविण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागली. मात्र, पुरेशा बोटी उपलब्ध नसल्याने बचावकार्यात काही वेळ विलंब झाला. हेलिकॉप्टरने मदत होऊ शकते का, याचीही चाचपणी करण्यात आली. तथापि खराब हवामानामुळे ते उडू शकले नाही.
जिल्हाधिकारी निधी पांडेय व महसूल विभागातील अधिकारी बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेही प्रशासनाला सूचना देत आहेत. सकाळच्या सत्रात फुलंब्री तालुक्यातील गावांतून १० जणांची, तर औरंगपूरमधील ४४ जणांची सुटका करण्यात आली. सिल्लोडमधील मौजे मांडणा येथे मंदिरावरच वीज पडली. या तालुक्यात सर्वाधिक १५७.८८ मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी सिल्लोड व फुलंब्री तालुक्यात मोठी वित्तहानी झाली.
जालना जिल्ह्यातील भोकरदन, मंठा, परतूर, अंबड तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्य़ात सतत ३० तास पाऊस बरसल्याने मोठय़ा रस्त्यांवरील वाहतूक विस्कळित झाली. बदनापूर तालुक्यातील मालेवाडी गावाचा संपर्क तुटला होता. करमाडजवळील पाझर तलाव फुटल्याने भाकरवाडी गावात पाणी शिरले. िहगोली जिल्ह्यातील कयाधू नदी या पावसाळ्यात चौथ्यांदा दुधडी भरून वाहू लागली. औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, िहगोली जिल्ह्यांतील २० तालुक्यात अतिवृष्टी झाली. मात्र, दुष्काळी उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत जेमतेमच पाऊस पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा