औरंगाबाद : समाजातील नायकवादाच्या वृत्तीस माध्यमे, विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमे खतपाणी घालताना दिसतात. त्या नायकवादाचा फुगा फोडणे, ही वृत्तपत्रांची जबाबदारी आहे. त्यासाठी एखाद्या विशिष्ट विचारवादास बांधून घेण्यापेक्षा, सर्वानाच प्रश्न विचारणारी पत्रकारिता हीच प्रामाणिक पत्रकारिता, हीच खरी वैचारिकता ठरते, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी रविवारी व्यक्त केले. यंदाचा ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ आणि मधुकरअण्णा मुळे यांच्या हस्ते रविवारी कुबेर यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ५० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अशा काळात नैतिकतेचे मूल्य मानून नियमाधारित व्यावसायिकता पाळणे यात काहीच गैर नाही, असे सांगून कुबेर म्हणाले, की टिळक-आगरकर यांच्या पत्रकारितेची उद्दिष्टे उदात्त होती. त्यांची ध्येये मोठी होती. त्यांच्यासाठी पत्रकारिता हे त्यांच्या उद्दिष्टपूर्तीचे साधन किंवा माध्यम होते. त्या काळातील पत्रकारितेचा दाखला आता देणे, हे त्या आणि आजच्या काळातील पत्रकारितेवरही अन्याय करणारे असेल. काळाबरोबर पत्रकारितेचे पर्यावरण आता बदलले आहे. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवरील पत्रकारितेचे निकषही एकच असायला हवेत. मात्र तसे होताना दिसत नाही. पत्रकारिता हा समाजाच्या मनाची मशागत करणारा आणि बौद्धिकता जपणारा व्यवसाय आहे. कोणताही वैचारिक वाद हा परिपूर्ण नसल्याचे स्पष्टपणे दिसत असताना एखादाच विचारवाद पत्रकारितेने जवळ का करावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एखादी विचारसरणी स्वीकारून त्याचा उदोउदो करणारे फक्त शिक्के मारत राहतात. कोणी संघाचा, काँग्रेसचा, कोणी समाजवादी असा या शिक्क्यांमध्ये आता नक्षल आणि शहरी नक्षल, असेही कप्पे केले जात आहेत. परंतु या सगळय़ा विचारवादांकडे कानाडोळा करून विषयाची गरज आणि निकड ओळखून विषयाच्या मुळाशी जाऊन लिहायला हवे. एखाद्याच्या कपाळावर असा कोणताच शिक्का मारता येत नाही, तेव्हा समाजातील अशा समूहांची पंचाईत होते, असेही ते म्हणाले.
बदलत्या पत्रकारितेच्या स्वरूपात बातमी देणे हे कौशल्य राहिलेले नाही. बातमी स्वयंचलित झाली आहे. काय, कधी, कुठे, केव्हा, कसे आणि का या प्रश्नांची उत्तरे देताना ‘आताच का’ आणि ‘पुढे काय’ हे दोन निकषही आता जोडायला हवेत. अन्यथा पत्रक वाटणे आणि पत्रकारिता यात फरकच राहणार नाही, असे सांगताना कुबेर म्हणाले, की ‘वाचक वाचतच नाहीत, असे म्हणणारे पत्रकार सार्वत्रिक मनोरंजनीकरणाच्या प्रवाहात विदूषकासारखे काम करू लागले असून त्यामुळे समाजाच्या बौद्धिक ऱ्हासास मदतच होत असल्याचे दिसते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता पानट यांनी केले. अनंत भालेराव यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या काळात हैदराबाद मुक्ती संग्राम लढय़ावर प्रामुख्याने लिखाण केले. पण आजही तो लढा पुणे, मुंबईसह राज्यात अन्यत्र अनेकांना माहीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे यांचे या वेळी भाषण झाले. मानपत्राचे वाचन नीना निकाळजे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव कुळकर्णी यांनी केले.