प्रति टन भाडेवाढ ७० टक्के, जुन्या- नव्या दरात ११२ रुपयांचा फरक
मराठवाडय़ात ७६३ टँकरने पाणीपुरवठा
राज्यातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरच्या दरात राज्य सरकारने घसघशीत वाढ केली आहे. सध्या प्रति मेट्रिक टन १५८ चा दर आता २७० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. ही वाढ ११२ रुपयांची आहे. त्याची टक्केवारी ७० टक्के एवढी होते. तसेच डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्याने प्रति किलोमीटर भाडेही दोन रुपयांवरून ३.४० पैसे करण्यात आले आहे. या पूर्वी २०१२ च्या दुष्काळात टँकरच्या दरात राज्य सरकारने वाढ करण्यास मुभा दिली होती. टॅँकर देयकांसाठी जीपीएस प्रणाली मात्र पुन्हा एकदा बंधनकारक करण्यात आली आहे.
मराठवाडय़ात या वर्षी भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे. एकीकडे थंडीने मराठवाडा गारठला आहे. तापमान दहा अंशापेक्षा कमी असले तरी पिण्यासाठी पाणी नसल्याने दररोज टँकरची संख्या वाढवावी लागत आहे. औरंगाबाद जिल्हय़ात सर्वाधिक ४९२ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जालना, बीड, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यंतही टँकरची संख्या वाढू लागली आहे. ज्या ठिकाणी टँकर भरले जातात त्या गावाच्या ग्रामपंचायतीस अधिक वीज देयक येते. ती रक्कमही टंचाई आराखडय़ातून खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, टँकरच्या दरात करण्यात आलेली घसघशीत वाढ लक्षणीय मानली जाते. टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य नाही, अशी कोणतीही तक्रार प्रशासनाकडे नव्हती. मात्र, डिझेल दर लक्षात घेऊन दरांमध्ये वाढ करण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. २०१२ मध्ये डिझेल दर ४६ रुपये प्रतिलिटर होता. आता तो ६८.६३ एवढा आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठय़ाच्या निविदेसाठी कमाल मर्यादा किती असावी, याचे दर देण्यात आले आहेत. ज्या भागात मोठे टँकर जात नाहीत किंवा घाटमाथा आहे अशा ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केल्यास त्यासाठी स्वतंत्र दर देण्यात येणार आहेत. या दरातही वाढ करण्यात आली आहे. तीन हजार ते पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी पूर्वी प्रति मेट्रीक टन १९८ रुपये प्रतिदिन भाडे होते. ते आता ३३८ रुपये करण्यात आले आहे. टँकरच्या दरातील ही वाढ भुवया उंचवायला लावणारी आहे. यापूर्वी विहीर अधिग्रहणासाठीच्या दरातही वाढ करण्यात आली होती. प्रति दिन ४०० रुपयांवरून हा दर ६०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
टँकरचालकांना जुन्या दराने पाणीपुरवठा करणे परवडत नाही, असे कधी ऐकले नाही. त्यांच्या मागण्यांचे निवेदन सरकारला दिले जाते याची सार्वजनिक व्यासपीठांवर, माध्यमांमध्ये कधी चर्चा होत नाही. तरीही टँकरचे दर वाढतात. हे दर मेट्रीक टनामध्ये का असतात? सामान्यपणे द्रव पदार्थ मोजण्याचे एकक लिटर असते. मग टँकरचे पाण्याचे देयक देताना हे दर टनांमध्ये कसे जातात? आता त्यात ७० टक्कय़ांची वाढ म्हणजे टँकर लॉबीला फायदा असेच चित्र दिसून येत आहे. खरे तर हे दरही महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून मंजूर व्हायला हवेत.
– प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ, औरंगाबाद