अवैध मासेमारी, वृक्षतोडीचा परिणाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पैठण येथील जायकवाडी धरण परिसरात दरवर्षी येणाऱ्या विदेशी पक्ष्यांच्या संख्येत अलिकडे कमालीची घट झाली असून चार वर्षांपूर्वी जायकवाडीच्या संपूर्ण जलाशयावर लाखोंच्या संख्येने दिसणारे पक्षी आता हजारोंच्या घरात आहेत, असे निरीक्षण पक्षिमित्रांनी नोंदवले आहे.

दिवसेंदिवस कमी होत जात असलेले पर्जन्यमान, जायकवाडीतील पाणलोट क्षेत्रात चालणारी अवैध शेती, मासेमारी, त्यांच्याकडून पाण्यात फेकण्यात येणारे जाळे व त्यात पाय अडकून पडल्यामुळे पक्ष्यांना होणारी दुखापत, परिसरातील काही नागरिकांकडून जलाशयात टाकली जाणारी घाण, थर्माकोल, रासायनिक खते आणि परिसरातील वृक्षतोड आदी कारणांमुळे पक्ष्यांच्या संख्येत घट होत असल्याचे पक्षिमित्र सांगतात. या शिवाय जायकवाडीजवळ असलेल्या काही शहरांतील व २८ गावखेडय़ातील घाण, सांडपाणीही जलाशयात येऊन मिसळत असल्यामुळे पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय जायकवाडी हे पर्यावरण संरक्षित क्षेत्र असतानाही त्याबाबत घेण्यात येणारी दक्षता घेतली जात नाही.

या वर्षी मुग्धबलाक, रोहित (फ्लेमिंगो), चमचा, बदके, कृष्णक्राँच हे पक्षी चांगल्या संख्येने आलेले आहेत. तर रंगीत करकोचे, सुरय, कुरव या पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहे. लालचोची सुरय, छोटा सुरय, धांविक, लालसरी बदक, भुवई बदक, शाही ससाणा (चमचा), चिखल्या, तुतवार, गळाबंद पाणलावा, पाणलाळे आदी पक्षीही तुरळक दिसत आहेत, अशी माहिती पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक यांनी दिली.

जायकवाडी परिसरातील पक्षिजीवन वाचवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जागतिक पाणथळ दिवस साजरा करण्यात आला. वनविभाग व विभागीय आयुक्तालयाच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी जायकवाडी परिसरात साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मुख्य सहायक वनसंरक्षक सोनटक्के, संजय भिसे, पैठणचे तहसीलदार सावंत आदींसह एनसीसीसह अन्य विद्यार्थीही उपस्थित होते, असेही डॉ. पाठक यांनी सांगितले.

जायकवाडी धरण परिसरात स्थलांतरित होऊन आलेले देशी व विदेशी पक्षी हेही शेतकऱ्यांचे मित्रच आहेत. शेतातील पिकांवरील किडे, पाण्यातील किडे, जलचर मासे खाऊन विष्ठेद्वारे पिकांना खतही त्यांच्यापासून मिळते. पाण्यातील जीवजंतू, शैवाळ, पाणवनस्पती खाऊन पाणी स्वच्छ ठेवतात. म्हणून या पक्ष्यांना जपणे शेतकरी, मासेमारांसह सर्वाचेच काम आहे.    – डॉ. किशोर पाठक, पक्षिमित्र.