जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी यावर्षी ३०४ गावाची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी प्राधान्यक्रमाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणांची कामे करण्यात येत आहे. यात जिल्हास्तर समितीने चार हजार कामे प्रस्तावित केली असून त्यापैकी जवळपास पाचशे कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित कामे पावसाळ्यापुर्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्ह्यात सातत्याने कमी होणाऱ्या पर्जन्यमानामुळे पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनासह लोकसहभागातून जलसंधारणांची कामे होत आहे.

दुष्काळी परिस्थितीशी लढण्यासाठी संबंधित गावात शासनाकडून जलसंधारणांच्या कामास महत्त्व देण्यात येत आहे. यात जलयुक्त शिवारसह विविध जलसंधारणांची कामे करण्यात येत आहे. यासाठी प्राधान्यक्रमाने गेल्या वर्षांपासून दुष्काळी गावात कामे सुरू आहे. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील ३०४ गावाची निवड करत त्याठिकाणी कामे करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हास्तर समितीने या दुष्काळी गावात चार हजार ६१ कामे प्रस्तावित केली असून त्यापैकी ४९१ कामे पूर्णात्वास आली आहे. यासह ८५७ कामे प्रगतीपथावर असून आगामी काही दिवसात ती पूर्ण होतील.

शासनाने नुकताच दुष्काळी जाहीर केला असून त्यात औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्वाधिक तालुक्याचा समावेश आहे. यात औरंगाबाद जिह्यातील पूर्ण गावात दुष्काळ असून गंगापूर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड तालुक्यात दुष्काळीची तीव्रता अधिक आहे. जिल्ह्याची पाणीपातळी खालावल्याने जिल्हा प्रशासनाकडून पाचशे गावातील नागरिकांची तहाण टँकरने भागवावी लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणांची कामे करण्यात येत आहे.

Story img Loader