छत्रपती संभाजीनगर: बीडजवळील बार्शी नाका परिसरातील वळण रस्त्यावर सोमवारी रात्री पाच ते सहा वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार तर दहा ते बारा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एका टेम्पोने दोन ऑटोरिक्षा, दोन दुचाकींसह एका गॅस सिलिंडरच्या छोट्या टेम्पोला धडक दिली.
हेही वाचा : आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठीचा विधिमंडळाचा ठराव केंद्राकडे पाठवा; पाठिंबा देण्याचे उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
मिळालेल्या माहितीनुसार एक मोठा टेम्पो छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव निघाला होता. मात्र, बार्शी नाका परिसरातून त्याने अचानक बीड शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेतले. या वेगाने चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने एका ऑटोरिक्षाला धडक दिली. तो रिक्षा अन्य वाहनांवर जाऊन आदळत सुटला. रिक्षाखाली दबून व रिक्षातून फेकले गेलेल्या दोन तरुणांसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांना व जखमींना तातडीने बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे जखमींवर उपचार सुरू असून, मृतांची आेळख पटवण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.