छत्रपती संभाजीनगर : परळी तालुक्यातील नाथ्रा गावात शनिवारी दुपारनंतर गोळीबार झाल्याची घडली आहे. याप्रकरणी रात्री महादेव मुंडे यांच्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून गोळीबाराची घटना प्राथमिक माहितीनुसार आर्थिक देवाणघेवाणीतून घडल्याचे समोर येत असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष पाटील यांनी दिली. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले आदींनी नाथ्रा गावाला भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : रेल्वेच्या धक्क्यात कुत्र्यासह वकिलाचा मृत्यू

नाथ्रा हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, आमदार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विद्यमान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे मूळ गाव आहे. परळी शहरात मागील महिन्यात मरळवाडीचे सरपंच बापूराव आंधळे यांची गोळीबार करुन हत्या झाल्याची घटना घडली आहे. नाथ्रा येथील महादेव मुंडे व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मुंडे यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला व यातील एकाने आपल्या जवळील रिव्हॉल्वर काढत थेट हवेत गोळीबार केला. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. घटनेने गावात दहशत निर्माण झाली.