छत्रपती संभाजीनगर : चोरी, गहाळ झालेले सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी-चारचाकी वाहने, मोबाईल फोन, जनावरे, विहिरीवरील बॅटऱ्या आदी ५ कोटी ७० लाख ९० हजार ९६६ रुपयांचा २४२ प्रकरणांतील मुद्देमाल मूळ तक्रारदारांना शुक्रवारी ग्रामीण पोलिसांकडून परत करण्यात आला. ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर पालकमंत्री संदिपान भुमरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.

हेही वाचा : “१०-१२ टक्के मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या”, भुजबळांच्या वक्तव्यावर जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले…

जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात अंतर्गत दाखल गुन्ह्यातील तपासातून हा हस्तगत मुद्देमाल आहे. यामध्ये ४३ चारचाकी वाहने आहेत, ज्यांची किंमत २ कोटी ५९ लाख ४४ हजार ६२० रुपये आहे. एक कोटी ८१ लाख ६६ हजार २०० रुपये किंमतीची १४ अवजड वाहने आहेत. ८ लाख ९९ हजार ३६६ रूपये रोख रक्कम परत करण्यात आली आहे. ४२ लाख ८३ हजारांची ८५ दुचाकी वाहने तर १२ लाख ६७ हजार ७३२ रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, ४ लाख ५० हजारांची चार तीन चाकी वाहने व २ लाख ९५ हजार ६९७ रुपयांचे २० मोबाईल व इतर मुद्देमालाचा समावेश आहे. यावेळी पोलीस पाटील, विविध गणेश व दुर्गा मंडळांनाही सन्मानित करण्यात आले.