छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा व क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या अनुक्रमे एक व दोन घटनांमध्ये तिघांना लुटले आहे. यामध्ये दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटण्यात आले आहे. तिन्ही घटनांमध्ये मिळून साडे आठ तोळे सोने चोरून नेल्याची घटना रविवारी घडली. उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीतील घटना ज्योतीनगर येथील अतुल सावे यांच्या घराजवळची असून, या परिसरात तीन अज्ञात तरुणांनी नजीक येऊन लुटल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सिग्मा हाॅस्पिटलजवळील हाॅटेल व्यावसायिक सतीश नारायणराव सकुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीच्या ८ ग्रॅम सोन्याची साखळी व दोन अंगठ्या, ३ ग्रॅमची एक अंगठी व २७ ग्रॅमचा सोन्याचा दागिना, असे साडे पाच तोळ्याचा ऐवज तीन अज्ञात तरुणांनी सावे यांच्या घराजवळील काॅर्नरनजीक येऊन लुटून नेला. सोन्याची दागिने अंगावर लेऊ नये, त्याला धोका आहे, अशी थाप मारून तिघांनी लुटले, असे सकुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या दोन्ही घटना क्रांती चौक ठाण्याच्या हद्दीतील असून, रुपाली संतोष मुंडे यांचे सिद्धार्थ उद्यानातून बाहेर पडताना गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे गंठण अज्ञातांनी पळवले. तर मीना सुधीर महिंद्रकर यांचे सव्वा तोळ्यांचे गंठण गुलमंडी परिसरातून चोरून नेले.