छत्रपती संभाजीनगर : आता भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राहिलेली नाही. ती एक ‘ डुप्लीकेट’ पार्टी आहे. त्यांच्याकडे कलंकित नेते गेले की ते शुद्ध होतात आणि तेच नेते जर आमच्याकडे आले की कलंकित कसे ? असा सवाल करत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी संघ दक्ष करुन दाखवावे, असे आव्हान दिले.
हेही वाचा : धर्मांतराच्या संशयावरून सुदान मधील तरुणाला अटक
‘कोणी मिर्चीचा व्यापार करतात तर कोणी मिर्चीबरोबर व्यापार करतात’, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्ची या गुंडाशी असणारे संबंध सर्वांना माहीत आहेत. ते आता कलंकित नाहीत का, प्रताप सरनाईक यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाची कारवाई झाली नव्हती का, भावना गवळी, सुनील तटकरे हे आता कलंकित का नाहीत, छगन भुजबळ यांना तर कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाजपची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली आहे. अशा व्यक्तींना घेतल्याशिवाय त्यांना निवडणूक लढता येणार आहे का, खरे तर आताची भाजप आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची राहिलेली नाही. आणि खरेच ते संघाचे असतील तर विखेंनी संघ दक्ष करुन दाखवावे, असे आव्हान अंबादास दानवे यांनी विखेंना शनिवारी पत्रकार बैठकीत दिले. अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा आढावा देण्यासाठी दानवे यांनी ही पत्रकार परिषद घेतली.