छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी वैजनाथ येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आणि दोषारोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी रद्द केले.
राज ठाकरे यांच्या अटकेनंतर २००८ साली उसळलेल्या दंगलीमध्ये परळी-गंगाखेड या मार्गावर एस. टी. बस थांबवून दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी राज ठाकरे व इतर आरोपीविरुध्द विविध कलमांखालील गुन्ह्यांसह सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध कायदा तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ११३५ अन्वये परळी वैजनाथ येथील ग्रामीण येथे प्रथम प्राथमिक अहवाल माहितीची (एफआयआर) नोंद घेण्यात आली. संबंधित तपासी अधिकारी यांनी गुन्हयाचा तपास करून राज ठाकरे व इतर आरोपी यांच्या विरोधात परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याला अॅड अरुण शेजवळ यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.
सुनावणीमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा दोषारोपपत्रात नाही तसेच कथीत घटनेच्या वेळेस राज ठाकरे हे घटनास्थळी नव्हते, आदी मुद्यांवर युक्तिवाद करण्यात आला. ॲड. शेजवळ यांना सांची किर्तीकर यांनी सहकार्य केले.