छत्रपती संभाजीनगर: येथील वाळूज औद्योगिक वसाहतीतील यशश्री प्रेस कोम्स प्रा. लि चे संचालक हेमंत मधुकर कंक (६४) यांचे अपहरण करून बारा कोटींची खंडणी मागायची व रक्कम मिळाल्यानंतर त्यांना संपवायचे, असा कट रचणाऱ्यांचे बिंग फुटले. या प्रकरणी पोलिसांनी कट रचणाऱ्या सहा जणांना अटक केली असून, त्यांनी आर्थिक विवेंचनेतून खंडणी मागण्याचा कट आखल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

किरण सखाराम कोल्हे (२३, रा. गुरुपिंपरी ता. घनसावंगी जि. जालना), ऋषीकेश विष्णू हुड (१९, रा. पाडळी ता.पैठण), आकाश भाऊसाहेब पाचरणे (२२, रा. भोयगावं ता. गंगापूर) रोहीत दत्तात्रय ढवळे (२१, रा. हिंगणीबेरडी ता. दौंड जि.पुणे), आदेश जनार्दन गायकवाड (१९, रा. शिवूर बंगला ता. वैजापूर) आणि कार्तिक सचिन पवार (१९, रा. कोरडगाव ता. वैजापुर) अशी आरोपींची नावे असून त्यातील पहिल्या तीन आरोपींना १९ जून रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले, तर उर्वरित तीन आरोपींना शुक्रवारी २१ पहाटे अटक केली. सहाही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.जी. गुणारी यांनी २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: दहा हजारांची लाच; तलाठ्यासह दोघे “लाचलुचपत”च्या सापळ्यामध्ये

रचलेला कट पूर्णत्वास नेण्यासाठी आरोपींनी अग्निशस्त्र खरेदी केले होते असा पोलिसांना संशय असून पोलीस त्या दृष्टीने तपास करित आहेत. तसेच आरोपींनी कट रचल्याची कबुली दिली असून या कटाच्या पाठीमागे आणखी कोण्या महत्वाच्या व्यक्तीचा हात आहे किंवा गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील उद्धव वाघ यांनी न्यायालयाकडे केली होती.

प्रकरणात वाळुज एमआयडीसी येथील यशश्री प्रेस कोम्स प्रा.लि चे संचालक हेमंत मधुकर कंक (६४) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, कंक यांच्या कंपनीचे वाळुज भागात चार प्लांट आहेत. २४ मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कंक हे रोपळेकर रुग्णालयाजवळील पोळी भाजीकेंद्रासमोर आपल्या चारचाकीत बसत होते. त्यावेळी त्यांच्याजवळ एक भयभित असलेला व्यक्ती आला व त्यांना तुम्ही कंक साहेब आहेत ना, तुम्ही यशश्री कंपनीचे संचालक आहेत ना अशी विचारणा त्याने केली. त्यावर कंक यांनी होकार दिला व त्या व्यक्तीला नाव गाव विचारले. मात्र त्याने त्यावर काही उत्तर न देता, मी व माझी आई एकटेच राहतो, माझ्या जिवाला धोका आहे, असे म्हणत त्याने कंक यांना चार-पाच दिवसांपासून दोन-तिन व्यक्ती तुमचा पाठलाग करुन तुमच्यावर पाळत ठेवत आहेत, तुमचे अपहरण करण्याचा त्यांचा कट असून तुमच्या जीवाला धोका असल्याचे त्याने सांगितले. या कटात किरण कोल्हे आणि रोहित ढवळे हे असल्यची देखील माहिती त्याने कंक यांना दिली. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास महावीर चौकाजवळ पुन्हा तोच व्यक्ती कंक यांना भेटला व साहेब जीवाची काळजी घ्या असे म्हणून निघून गेला.

हेही वाचा : ओडिसामध्ये नवीन मत्स्य प्रजातीचा शोध

आकाश पाचरनेचे नाव आले समोर

कंक यांनी कंपनीचे संचालक धनंजय पवार यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी कटाची माहिती देणार्‍याचा शोध सुरु केला. तेंव्हा आकाश पाचरने असे त्याचे नाव असून तो एमआयडीसी वाळुज परिसरात राहत असल्याचे समोर आले. पवार यांनी पाचरनेचा मोबाइल क्रमांक मिळुन त्याला फोन केले मात्र त्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. म्हणून पवार यांनी त्या परिसरात माहिती घेतली असता, महाराणा प्रताप चौकाजवळ आरोपी किरण कोल्हे याचे सागर अमृततुल्य हॉटेल असल्याचे समजले. त्यांनी एका चहा टपरीवर काम करणार्‍या एका मुलास पाचरनेचा फोटो दाखवून त्याबाबत चौकशी केली असता त्या मुलाने ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र त्याच मुलाने कंक यांच्या कारचा फोटो काढून आरोपी पाचरने याच्या मोबाइलवर पाठवला. ही बाब तपासादरम्यान समोर आली. प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : Video : रील्स करताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू

खंडणीसाठी जिवे ठार मारण्याचा रचला कट

पोलिसांना कटाचा सुगावा लागल्यानंतर वरील तिघा आरोपींना अनुक्रमे दौंड, पुणे आणि वैजापुर येथून ताब्यात घेतले. दरम्यान त्यांनी साथीदार रोहीत ढवळे, आदेश गायकवाड आणि कार्तिक पवार यांच्या साथीने कट रचल्याचे कबुल केले. तसेच कंक यांचे अपहरण करुन 12 कोटींची खंडणी मागून त्यांना जिवे ठार मारण्याचा कट रचला होता. विशेष म्हणजे रचण्यात आलेला कटाचा संपूर्ण आराखडा हा एका कागदावर मांडण्यात आला होता, अशी कबुली देखील आरोपींनी दिली आहे.