छत्रपती संभाजीनगर: आर्थिक व्यवहारातून एका डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरच्या पायाची घोड नस काचेच्या तुकड्याने कापून हल्ला केला. २२ जून रोजी रात्री वाळूजमधील रुबी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर डॉक्टरवर वाळूज पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. आतिक आजम पठाण असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. समीना दौलतखाँ पठाण (रा. पंढरपूर ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार आरोपी डॉ. आतिक याला डॉ. समीना यांनी हात उसने पैसे दिले होते. वारंवार पैसे मागूनही डॉक्टर आतिक पठाण हा पैसे परत देण्यास टाळाटाळ करू लागला.

हेही वाचा : लोकसभेवर निवडून येऊनही भुमरे मंत्रीपदी कायम?

२२ जून रोजी रात्री आठ वाजता सुमारास डॉ. आतिक पठाण यांच्या रुबी हॉस्पिटलमध्ये महिला फिर्यादी पैसे मागण्यासाठी गेल्या. मात्र डॉ. आतिकने पैसे मागितल्याच्या रागात काचेच्या तुकड्याने डॉ. समीना यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पायाच्या घोड नस कापून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करून मारहाण करीत गंभीर जखमी केले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.