छत्रपती संभाजीनगर : राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पैठण औद्योगिक वसाहत, छत्रपती संभाजीनगरमध्येही छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये कोकेन, मेफाड्राॅन, केटामाईन, या तीन प्रकारचा २५० कोटींपेक्षा अधिक किंमत असलेला अमलीपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संदीप शंकर कामावत याला अटक करण्यात आली असून त्याला पैठणच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संदीप कामावत याला सिडको पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्याविषयीचे केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाचे पुणे येथील अधिकारी विशाल संगवान यांनी पत्र दिल्याची माहिती सिडकोच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. गुजरा़तमधील एका गुन्ह्यातील तपासाच्या अंगाने अहमदाबादमधील केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा (डीआरआय), तेथील गुन्हे शाखा व पुण्यातील डीआरआय विभागाचे पथक २० ऑक्टोबरपासून या कारवाईसाठी शहरात दाखल झाले आहे. अमली पदार्थ बनवणारी कंपनी पैठण येथील आैद्योगिक वसाहतीमध्ये आहे. तेथील महालक्ष्मी इंडस्ट्रिजमध्ये केलेल्या छापेमारीत मेफाड्रोन व केटामाईन आढळून आले आहे.

हेही वाचा : “पुतण्या फुटला, मात्र लांडग्याची पिलावळ भुजबळांमागे”, शरद पवारांवर पडळकरांची अप्रत्यक्ष टीका

तर आरोपींच्या घराच्या परिसरातून २३ किलो कोकीन, २.९ किलो मेफाड्रोन आणि ३० लाख रुपये रोख रुपये आढळून आले. तर पैठणच्या महालक्ष्मी इंडस्ट्रिजमध्ये मेफाड्रोन व केटामाईन अनुक्रमे ४.५ किलो व ४.३ किलो सापडले. तसेच याशिवाय मेफाड्रोन मिश्रण असलेले ९.३ किलोचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत २५० कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. ही कारवाई रोहीत निगवेगकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असू शकतील असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : सोलापूर : केसीआरकन्या ‘ब्रतुकम्मा’ उत्सवात रमल्या अन् कडाडल्याही…

छत्रपती संभाजीनगरमध्ये डीआरआय विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्यातील पोलीस काय काम करतात, ते केवळ मिठाईच्या दुकानावर छापे मारण्यासाठी आहेत काय, असा प्रश्न केला आहे. अहमदाबादमधील पोलिसांना माहिती मिळते, मग राज्यातील पोलीस विभाग झोपला आहे काय, असा प्रश्नही या कारवाई नंतर केला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chhatrapati sambhajinagar drugs of rupees 250 crores seized from paithan industrial area css