छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी अपर्ण केलेल्या सोन्या- चांदीचे दागिने वितळविण्यासाठी राज्य सरकारने ३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने कारवाई करण्यास पुढील आदेश येईपर्यंत मनाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय वाघवासे आणि न्यायमूर्ती विभा कांकणवाडी यांनी दिले आहेत.
१ जानेवारी २००९ ते १० जून २०२३ या कालावधी भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तू वितळवून ते बँकेत ठेवण्याची परवानगी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी मागितली होती. राज्य सरकारने त्याची प्रक्रिया ठरवून देत या कारवाईस परवानगी देण्यात आल्याचे पत्र विधि व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सु.प. साळुंके यांनी दिले होते. त्यानुसार दागिन्यांचे मोजमापही करण्यात आले. त्यात अनेक दागिने गहाळ झाल्याचे पुढे आले होते. मात्र, आहे ते दागिने वितळविण्याच्या या प्रक्रियेशी भाविकांच्या श्रद्धा जोडलेल्या असल्याने त्यावर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये, असे उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : केंद्रीय पथकाची दुष्काळपाहणी; बुधवारपासून आठ जिल्ह्यांचा दौरा
तूळजाभवानी मंदिरात भाविकांनी गेल्या १४ वर्षांत अपर्ण केलेले २०७ किलो सोने व अडीच हजार किलो चांदी असल्याचे मोजणीतून स्पष्ट झाले होते. हे दागिने वितळवून बँकेत ठेवल्यास ती रक्कम तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या विकासासाठी उपयोगी पडू शकते, असा दावा जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिराच्या संस्थानाच्या अध्यक्ष सचिन ओम्बासे यांनी केला होता. दागिने मोजताना अनेक वस्तू गहाळ झाल्याचा अहवाल समोर आल्याने खळबळ उडाली होती. यामध्ये देवी चरणी अर्पण केलेल्या देवीचाही समावेश होता. न्यायालयाने याचीही नोंद घेतली असून पुढील ओदशापर्यंत शासनाच्या दागिने वितळविण्याच्या प्रक्रियेत हालचाल करू नये, असे आदेश बजावले आहेत. पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी या दागिने वितळविण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. त्यांच्याकडून ॲड. सुरेश कुलकर्णी यांनी काम पाहिले.