छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथे शेतीतील वादातून लाठ्या-काठ्या मारून निर्घृण खून केल्याप्रकरणात चौघांना जन्मठेप व विविध कलमांखाली ४४ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी बुधवारी सुनावली. सुनील तेजराव शेजवळ, संगीता सुनील शेजवळ, साहेबराव तेजराव शेजवळ आणि ज्योती साहेबराव शेजवळ, अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मृत कोंडिराम मालवणकर यांची पत्नी सुनीता यांनी १० जुलै २०१४ रोजी फुलंब्री पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
फिर्यादीनुसार जातेगाव येथील गट नं. ६५ मधील गायरान शेत जमीन मालवणकर व कुटूंबीयांकडे आहे. घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीपासून मालवणकर कुटुंबीय व आरोपींमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. या प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन निरीक्षक वाय. वी. जाधव आणि उपनिरीक्षक जी. टी. गायकवाड यांनी दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. या प्रकरणात माहिती पुरवण्याचे काम ताठे यांनी केले. दंडाच्या रक्कमेपैकी ४० हजार रुपये फिर्यादीला देण्याचे आदेशित केले आहे.