छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या ठेवलेल्या (स्ट्राँग रुम) एमआयटी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडण्याकडे दुर्लक्ष, हयगय केल्यासह अलिकडेच सातारा-देवळाई भागातील वीज बारा तास गुल झाल्याने महावितरणची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन केल्याचा ठपका ठेवत रेल्वे स्टेशन शाखेचे सहायक अभियंता दादासाहेब बाबूराव काळे यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश छत्रपती संभाजीनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी काढल्याची माहिती बुधवारी देण्यात आली.
हेही वाचा : कंपनीच्या जमीन व्यवहारासाठी दोन कोटींची खंडणी; केजमध्ये गुन्हा
दादासाहेब काळे यांनी १५ मे रोजी सकाळी ७.३० ते ८.३० च्या दरम्यान स्वत:चे वाहन घेऊन स्ट्राँग रुम परिसरात गेले व बाहेर जाताना दुभाजकावर जाऊन धडकले. काळे यांचे वाहन दुसऱ्यांच्या मदतीने बाहेर काढावे लागले. मतपेट्या ठेवलेल्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचना असतानाही त्याचा काळे यांनी भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच २४ मे रोजी छावणी उपविभागांतर्गत देवळाई फिडरवरील ११ केव्ही वाहिनी परिसरातील झाडे तोडण्यासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर दुपारी अडीच ते रात्री साडे दहापर्यंत वीज पुरवठा विस्कळीत झाला. परिणामी अय्यप्पा मंदिर, ऊर्जानगर, चौधरी हेरिटेज परिसरातील वीजपुरवठा १२ तास खंडित झाला होता. यादरम्यान तांत्रिक कर्मचाऱ्यांशी संपर्क करून वीजपुरवठा सुरळीत करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न केल्यामुळे महावितरणविषयी जनमानसामध्ये असंतोष तयार झाला व त्यासंदर्भातील वृत्तही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. यासह इतर कारणांसाठी ठपका ठेवत दादासाहेब काळे यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश काढण्यात आला आहे.