छत्रपती संभाजीनगर – भूम तालुक्यातील दुधोडी येथील तरुण माऊली बाबासाहेब गिरी याला अमानूषपणे मारहाण केल्यानंतर त्याचा पंधरा दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या निषेधार्थ व गिरीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भूम तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शुक्रवारी दुपारी सकल दशमान गोसावी आणि भटके मुक्त समाज बांधवांनी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

माऊली गिरी याच्या हत्येप्रकरणी सतीश जगतापसह सहा ते आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सीआयडीमार्फत करावा, मृताच्या कुटुंबीयास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, तसेच कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी मागण्यांचा मोर्चाकरांनी दिलेल्या निवेदनात समावेश आहे.

निवेदनावर दशनाम गोसावी समाज परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. राजेंद्र बन, साहेबराव गोसावी खानदेश अध्यक्ष,बाजीराव गिरी,रंगनाथ पैठणकर, ओमप्रकाश गिरी, संजू भारती, संपत पुरी, भगवान गोसावी, उमेश जोगी, किरण भारती, वासुदेव गोसावी, संजय गोसावी आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.