छत्रपती संभाजीनगर : कारागृहातील कैद्यांच्या सुविधांमध्ये नव्याने मोठी वाढ करण्यात आली असून त्यात नाडा नसलेल्या बर्मुडा पँटपासून न्यायाधीन कैद्यांसाठी ‘टी-शर्ट’ वापरण्याची आणि उपाहारगृहातून ती खरेदी करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी झाडू-सुपडी, बुद्धीबळाचा पट, ऊबदार कपडे, विक्स इनहेलर, जलजिरा, चिवडा, केळाची चिक्की, ओटस्, कॉफी, तोंडाला लावायची पावडर, खारे वाटाणे, धणाडाळ, विविध प्रकारची सरबते, पॉपकॉर्न यांसह जिलेबी, रसगुल्ला, नारळपाणी असे १६७ पदार्थ घेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गायीचे शुद्ध तूप व बटर हे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे त्यांना वगळण्यात आले असून मिठाई आणि एक किलोपर्यंतचा केक देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कारागृहात वाढदिवस साजरे झाले तर अडचण होऊ शकते. गुन्हेगारांचे वाढदिवस कारागृहात साजरे झाले तर गुन्ह्याचे उदात्तीकरण होऊ शकते, त्यामुळे एक किलोपर्यंतचा केक वगळण्यात आला आहे. झंडू बाम उपलब्ध करून दिल्यास नशा करता येत असल्यामुळे तोही वगळण्यात आला आहे. तर सूप पाकिट दिले तर गरम पाणी द्यावे लागेल. गरम पाणी देणे अडचणीचे होईल, त्यामुळे या वस्तू वगळण्यात आले आहे. मोड आलेले कडधान्य, मटण, पुरी-भाजी, अंडा-भुर्जी, पनीर, इडली-वडा आदी खाद्यपदार्थही आता कैद्यांना मागवता येतील, असे परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी नुकतेच काढले आहेत.

हेही वाचा : शेतीच्या वादातून खून; चौघांना जन्मठेप, फुलंब्रीमधील जातेगावची घटना

गेल्या काही दिवसांपासून कारागृहातील कैद्यांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती. त्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. कैद्यांना मागणी केलेल्या वस्तूंचा अतिरिक्त साठा बाळगता येणार नाही, याची काळजी कारागृहातील प्रमुखांनी घ्यायची असून घेतलेल्या वस्तू अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी कराव्यात, शहरात तसा विक्रेता उपलब्ध नसेल तर जवळच्या जिल्ह्यातून वस्तू खरेदी करता येऊ शकते. मात्र, किरकोळ विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कारागृहाच्या उपाहारागृहातून बूटपॉलिश, तूप, बटर, केक आणि तयार सूप, पेढा, बर्फी, फुटबॉल, तंबाखू, चहा मसाला पावडर, ग्रीन टी, शेविंग ब्रश, क्रीम आदी वस्तू वगळण्यात आल्या आहेत. पेढे आणि बर्फी वगळण्याच्या मागे विषबाधा होण्याचा संबंध असून जामीन झाल्यानंतर आनंदाच्या भरात कैदी आनंदोत्सव साजरा करतील. त्यामुळे कारागृहात वेगळीच प्रथा पडू शकते. याचा सुरक्षेला धोकाही संभवतो म्हणून हे पदार्थ वगळण्यात आले आहेत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chhatrapati sambhajinagar prisoners allowed to purchases 167 items from canteen css