छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील महिला वाहकाशी हुज्जत घालून मारहाण केल्याचा प्रकार पाचोड येथे मंगळवारी सकाळी घडला. या घटनेनंतर चालक सौदागर शेप यांनी बस थेट पाचोड पोलीस ठाण्यात नेऊन उभी केली. अखेर नवीन कायद्यानुसार शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कलमान्वये मारहाण करणारा अमोल जगन्नाथ डुकळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता आदिनाथ तोंडे, असे मारहाण झालेल्या महिला वाहकाचे नाव आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: पैठणजवळ पतीकडून पत्नीचा, तर बजाजनगरात सुरक्षारक्षकाचा खून

चालक सौदागर शेप व वाहक सविता तोंडे हे अंबेजोगाईहून पहाटे ५.३० वाजता बस (क्रमांक एम एच २० बी एल २८०४) घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे निघाले. त्यांची पाचोड येथे सकाळी ९.३० वाजता चहा – नाश्त्यासाठी थांबली होती. या दरम्यान अमोल डुकळे हा बसमध्ये बसण्यासाठी शिरला. तेव्हा बस वाहक सविता तोंडे यांनी जागा नसल्याने अमोल यास समजावण्याच्या भाषेत खाली उतरण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून अमोल डूकळे याने शिवीगाळ करत महिला वाहकाचा हात धरून बसखाली ओढले व मारहाण केली. या मारहाणीत सविता तोंडे यांचा मोबाईल गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले. बस चालक सौदागर शेप व प्रवासी भागवत शेलुकर यांनी भांडण सोडून बस थेट पाचोड पोलीस ठाण्यात नेऊन अमोल डूकळे यांच्या विरुध्द तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.