छत्रपती सभाजीनगर :शहरातील हर्सूल येथील गटनंबर २१६ आणि २१७ मधील गायरान जमीनीवरील अतिक्रमण सोमवारी हटविताना अतिक्रमण पथकावर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये महापालिकेचे दोन कर्मचारी जखमी झाले. हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हर्सूल येथे प्रधानमंत्री घरकूल प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी गटनंबर २१६ आणि २१७ मधील अडीच एकर जागा लागणार आहे. या जागेवर अतिक्रमण करून १८० जणांनी घरे थाटली होती. हे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाकडून वारंवार प्रयत्न केले जाते होते. परंतु, अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढून घेण्यास नकार दिला. त्यामुळे मनपाच्या अधिकार्‍यांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी पाच दिवसाचा वेळ दिला. या पाच दिवसातही अतिक्रमणधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी धडक कारवाई करीत १८० घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. यावेळी अतिक्रमणधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरी मित्र पथकाने समजावून सांगितल्यानंतर त्यांचा विरोध मावळला.

या संदर्भात माहिती देताना नागरी मित्र पथकप्रमुख प्रमोद जाधव म्हणाले की, आज मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मनपाचे अतिक्रमण पथक आश्विनी कोथलकर यांच्या नेतृत्वाखाली हर्सूलचे अतिक्रमण हटविण्यात आले त्या ठिकाणी पोहचले. ध्वनीक्षेपकावरून तेथील नागरिकांना तुमचे साहित्य काढून घ्यावे, जागेचे सपाटीकरण करायचे आहे, असे आवाहन करीत होते. त्या वेळी जमावाने आरडाओरड करीत धावत येत या पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. अतिक्रमण पथकातील माजी सैनिक गजानन चितळे यांचे डोके फुटले तर रामेश्वर निकम यांच्या पायाला मार लागला.