छत्रपती संभाजीनगर : भरधाव कार एका वाहनाला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात पती-पत्नी त्यांचा तरुण मुलगा जागीच ठार झाला, तर मृत दाम्पत्याची मुलगी व जावई गंभीर जखमी झाले. ही घटना धुळे-सोलापुर रोडवर फतियाबाद गावाजवळ शनिवारी पहाटे घडली. अलकाबाई राजू उचित (वय ५५), राजू आसाराम उचित (वय ६०), अर्जून राजू उचित (वय २५, रा. लाईननगर वाळुंज ता. गंगापूर) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
राजू उचित हे शुक्रवारी स्विफ्ट डिझायर कारने (क्र.०१ बीबी ७३३३) परिवारासह दर्शनासाठी कन्नड जवळील अंधानेर येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास ते छत्रपती संभाजीनगरकडे निघाले. कारमध्ये राजू उचित यांच्यासोबत पत्नी अलकाबाई, मुलगा अर्जून, विवाहित मुलगी आरती किरण दहितुले, जावई किरण दहितुले हे होते. मुलगा अर्जून कार चालवत होता. पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर रोडने ते संभाजीनगरकडे येत होते. फतियाबाद गावाजवळ भरधाव कारचे नियंत्रण सुटले अन् कार समोर जाणाऱ्या अज्ञात वाहनावर धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की, कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला. कारमधील राजू उचित, अलकाबाई उचित आणि अर्जून यांना हे तिघे जबर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. तर आरती दहितुले आणि किरण दहितुले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : मुंबई, पुण्याच्या शेतीसाठी ६० हजार कोटींचे कर्जकृषी; कर्ज वितरणात राज्यात अनुशेष
घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ दौलताबाद पोलिसांना दिली. दौलताबाद पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले व जखमींना रूग्णालयात दाखल केले. मृत अर्जुनचे चारच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तर त्याला तीन विवाहित बहिणी असून, एक सोबत असलेली बहिण आरती या गंभीर जखमी झाल्या आहेत.