छत्रपती संभाजीनगर : मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी अहिल्यानगरकडे जात असताना प्रवासी वाहन व ट्रकमध्ये शुक्रवारी सकाळी सांगवी बीड-केज मार्गावरील सांगवी पुलाजवळ झालेल्या अपघातात एक महिला व एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतांपैकी एक नियोजित वधूचा पिता तर महिला ही नवरदेवाची मावशी असून, दोघेही शिक्षक होते, अशी माहिती समोर आली.
जखमींमध्ये नवरीचे चुलते, एक भाऊ व अन्य दोघांचा समावेश आहे. उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले, असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती केज पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली. तर रामेश्वर डोईफोडे हे नियोजित वधूचे पिता यांचा मृत्यू अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असताना झाला. कासारी येथील रहिवासी असलेले रामेश्वर डोईफोडे यांच्या मुलीचा २३ फेब्रुवारी रोजी लग्न नियोजित होते.