छत्रपती संभाजीनगर – बीडमधील आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून आेळख असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या याच्याशी सख्य आणि त्याची बडदास्त ठेवणे दोन पोलिसांच्या अंगलट आले आहे. पोलीस कर्मचारी कैलास खटाणे आणि विनोद सुरवसे यांना निलंबित केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

सतीश भोसले याला सोमवारी शिरूर कासार येथे आणण्यात आले होते. या दरम्यान खोक्या एका मोबाईलवरून बाेलतानाची चित्रफित प्रसारित झाली होती. याशिवाय खोक्याची खाशी बडदास्त ठेवली जात असल्याची चर्चा सुरू झाली. या प्रकाराला गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षक काॅवत यांनी कैलास खटाणे आणि विनोद सुरवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. गुन्हेगाराशी सख्य, त्यांच्याशी मैत्री खपवून घेतली जाणार नसल्याचे काॅवत यांनी स्पष्ट केले.

सतीश भोसले उर्फ खोक्या हा बुलढाण्यातील एका व्यक्तीला बॅटने अमानूष मारहाण करताना, हेलिकाॅप्टरमधून फिरताना, वाहनात नाेटांची बंडले लावताना, अंगावर कित्येक तोळ्याचे सोन्याचे अलंकार घालून फिरतानाचे अनेक चित्रफिती समाजमाध्यमावर प्रसारित झाल्या आहेत. तसेच शिरूरजवळील ढाकणे पिता-पुत्रालाही मारहाण केल्याचा आरोप खोक्यावर आहे. या प्रकारामुळे खोक्या आणि सुरेश धसही चर्चेत आले होते. आमदार धस हे खोक्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचीही एक ध्वनिफित प्रसारित झाली होती.