छत्रपती संभाजीनगर: हनुमाननगर येथील मंडप व्यावसायिक अमित शिंदे यांच्या घरी २ जुलैला झालेल्या चोरीत ७९ तोळे सोने, रोख सव्वा अकरा लाख व इतर साहित्य पळवल्याची घटना घडली होती. या चोरी मागच्या कटाचा मुख्य सूत्रधार शिंदे यांच्याकडील कामगारच निघाल असून, चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आल्याची माहिती शनिवारी पोलिसांकडून देण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने या कामगारासहीत रेकॉर्डवरील ५ आरोपींना अटक केली. घरफोडीमध्ये ७९ तोळे सोने चोरीला गेले असताना २१ तोळ्याचे दागिने घरातच सापडल्याचे सांगण्यात आले असून आरोपींकडून पोलिसांनी केवळ ९९ ग्रॅम सोने जप्त केल्याचे नमूद केले आहे.
पथकाने विष्णुनगर भागात छापा मारत संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. या पकडलेल्या आरोपींनी शिंदे यांच्याकडे कामाला असलेला कामगार विनोद उत्तमराव पातारे याने शिंदे कुटूंब देवदर्शनासाठी बाहेर गेले असून घराबाबत रेकी करुन माहीती घेतली. पोलिसांनी या माहितीवरुन आरोपी विनोद उत्तमराव पातारे (वय ३० रा. बालाजीनगर), दीपक शिवाजी शिंदे (वय २४ रा.राजनगर, मुकूंदवाडी), संकेत संजय पवार (वय २२ रा. आंबेडकरनगर), मनोहर लक्ष्मण ससे (वय २१ रा. भानुदासनगर), विजय सुभाष बिरारे (वय २६ रा. जवाहर कॉलनी) आणि सचिन जग्गनाथ शहाणे (वय ३७ रा. बीड बायपास) यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून ९९ ग्रॅंम सोने, रोक रक्कम, एलइडी आणि दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदिप गुरमे, पीएसआय संदिप सोळंके, विशाल बोडखे, सतिश जाधव, संदिप तायडे, प्रकाश गायकवाड, अमोल शिंदे, नवनाथ खांडेकर आणि इतरांनी केली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: अपघातात पती, पत्नी, तरुण मुलगा ठार; मुलगी, जावई गंभीर जखमी
आरोपी सराईत गुन्हेगार
पोलिसांनी पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापैकी दिपक शिंदे याच्यावर ५ गंभीर गुन्हे, विजय बिरारे याच्यावर १४ गुन्हे, सचिन शहाणे याच्यावर ९ गुन्हे तर मनोहर ससे याच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत.