धाराशिव : राष्ट्रीय प्रवेश पात्रता परिक्षा (नीट) पेपरफुटीप्रकरणी आता नवीन खळबळजनक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. नांदेड येथील दहशतवादीविरोधी पथकाने रविवारी लातूर येथील दोनजणांना ताब्यात घेतले होते. आता याप्रकरणी धाराशिव येथील धागेदोरे समोर आले आहेत. उमरगा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका कर्मचार्‍याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत पैसे जात असल्याची माहिती आहे. त्यानुसार दिल्ली येथील एकजणासह एकूण चार जणांविरूध्द लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गटनिदेशक पदावर कार्यरत असणारा इरण्णा कोनकुलवार हा आरोपी नीट पेपरफुटी प्रकरणी समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवाशी असलेला कोनकुलवार मागील वर्षभरापासून उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत आहे. यापूर्वी तो लातूर येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत होता. नीटच्या निकालानंतर कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बिहार, गुजरात, पंजाब, हरियाणा राज्यांतही त्याचे परिणाम उमटले. त्यामुळे पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) सक्रिय झाली आहे. रविवारी लातूर येथील दोन शिक्षकांना नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. त्यामुळे या पेपरफुटीप्रकरणाचे धागेदोरे धाराशिवमार्गे दिल्लीपर्यंत असल्याचा पुरावा समोर आला आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: पायाची नस कापून महिला डॉक्टरवर डॉक्टरचा हल्ला; वाळूज परिसरातील घटना

लातूर येथील शिक्षकांच्या मोबाईल आणि लॅपटॉपची झडती घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट, काही संशयास्पद नोंदी आणि आर्थिक व्यवहाराच्या नोंदी आढळून आल्या. एटीएसने ताब्यात घेतलेले लातूरचे हे दोन्ही शिक्षक उमरगा येथे कार्यरत असलेल्या इराण्णा कोनगुलवार याच्या सतत संपर्कात असल्याचे समोर आले आहे. कोनगुलवार हा दिल्ली येथील एका व्यक्तीच्या संपर्कात होता. पैशाच्या व्यवहारात कोनगुलवार हाच मुख्य आरोपी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लातूरच्या दोन्ही शिक्षकांनी पैशाच्या मोबदल्यात नीट परिक्षेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी कोनगुलवार याच्यासोबत संधान साधले होते. तर कोनगुलवार हा दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत नीट परिक्षेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पैशाचे व्यवहार करीत होता. प्राथमिक माहितीनुसार लातूर ते दिल्ली व्हाया उमरगा असा हा नवीन गोंधळ समोर आला आहे.

हेही वाचा : लोकसभेवर निवडून येऊनही भुमरे मंत्रीपदी कायम?

उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोनगुलवार यांच्याबाबत विचारणा केली असता, शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने ते संस्थेत आले नव्हते. तर सोमवार आणि मंगळवार, अशी दोन दिवसांची रजा घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.