धाराशिव : सर्वच राज्याचे लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी देखील त्यांची भावना बोलून दाखवली आहे. या अंतिम निर्णयाची आपणही वाट पाहत आहोत अशा शब्दांत मंत्री प्रा. सावंत यांनी त्यांच्या मनातील भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता अपात्रतेची कुऱ्हाड कोसळणार की यातून दिलासा मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत हे सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांना अपात्रतेच्या कारवाई संदर्भात विचारणा केली असता आपणही वाट पाहत आहोत अशा शब्दात मनातील भावना बोलून दाखवल्या.
हेही वाचा : ठाकरे गटाला शह देण्यासाठी परभणीत महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वंतत्र मोर्चेबांधणी
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण राज्यभरात शेकडो बैठका घेतल्याचा खळबळजनक दावा आरोग्यमंत्री सावंत यांनी केला होता. गुजरात मार्गे गुवाहाटी या राजकीय प्रवासाची आखणी करण्यात आपला महत्त्वाचा वाढता होता. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी आखणी केल्याचे सावंत यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.
हेही वाचा : पीक विमा थकवल्याने कंपनीचे खाते गोठवले
आमदार अपात्रतेच्या प्रक्रियेत ज्या १६ लोकप्रतिनिधींची नावे आहेत त्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याही नावाचा समावेश आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने विहित कालावधीत निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत. १० जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीची मर्यादा पूर्ण होत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी काय निर्णय घेतात याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : मराठवाड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासमोर आव्हान
सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सत्ताधारी, विरोधक आणि थेट सत्ताधारी यांच्याशी हे प्रकरण निगडित आहे. हे सर्व सोळा आमदार प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मंत्री सावंत यांनी आपण निर्णयाची वाट पाहत आहोत अशा शब्दांत भावना व्यक्त करून त्यांनाही या प्रकरणी निर्णयाची तीव्रता जाणवत असल्याचे दाखवून दिले आहे.