धाराशिव : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर आले आहे. लवकरच सोलापूर-तुळजापूर-धाराशिव हा रेल्वेमार्ग सुरू होईल. तुळजापूर शहर शक्तीपीठ महामार्गाशीही जोडले जाणार आहे. लातूर-टेंभूर्णी महामार्गाचे काम हाती घेतले आहे. पूर्वी लातूरहून धाराशिवमार्गे केवळ रेल्वेगाडी एक धावत होती. आता एक डझनहून अधिक गाड्या या मार्गावरून धावत आहेत. भविष्यात तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र असलेले तुळजापूर रेल्वेचे मोठे जंक्शन होणार आहे. त्यासाठी अर्चना पाटील यांना मतदान करा. अर्चना पाटील यांना मत म्हणजे मोदींचे हात मजबूत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिवमध्ये प्रचारसभेत उपस्थित असलेल्या मतदारांना ग्वाही दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री बसवराज पाटील, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, उमेदवार अर्चना पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राजाभाऊ राऊत, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : निवडणुकीपेक्षाही पाणीटंचाईशी दोन हात महत्त्वाचे; मराठवाड्यातील दुष्काळी प्रदेशात प्रचाराचा मागमूसही नाही

काँग्रेस म्हणजे विश्वासघात. मराठवाड्याच्या या भूमीचाही काँग्रेसने अनेकदा विश्वासघात केला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कुणामुळे रखडली? जलयुक्त शिवार योजनेला कोण अडकाठी आणली? तुमच्या शिवारातील पाणी कोण अडवून धरले? याचा गांभीर्याने विचार करा. ज्यांनी तुम्हाला पाणी मिळू दिले नाही, तुम्ही त्यांना मत देणार का? असा सवाल उपस्थित करीत मोदी समस्या टाळत नाही. त्यांच्याशी दोन हात करतात, असे सांगत दहा वर्षांच्या कालावधीत केलेल्या अनेक विकासकामांची जंत्री त्यांनी उपस्थितांसमोर सादर केली. एकट्या धाराशिव जिल्ह्यात 800 कोटी रूपये शेतकर्‍यांना दिले आहेत. ७५ लाख घरांना नळाद्वारे पाणी देण्याचे काम आपल्या कार्यकाळात झाले आहे. आपण देशाचे भवितव्य बदलू पाहत आहोत आणि विरोधक आपल्याला बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यांना देशाशी काहीही देणेघेणे नाही. खरे बोलायला जागा नसल्याने खोटेपणाची आवई उठवली जात आहे. विधानपरिषद, विधानसभा, संसद प्रत्येक ठिकाणी एससी, एसटी, आदिवासी यांना सर्वाधिक प्रतिनिधीत्व भाजपाने दिले आहे. त्यामुळेच हा वंचित आणि दलीत घटक मोठ्या प्रमाणात भाजपाचे समर्थन करीत आहे. त्याचा इंडीया आघाडीला त्रास होत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

जगदंबेने छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी आशीर्वाद दिला. त्याच पवित्र धर्तीवरून जनता जनार्दन आणि साक्षात जगदंबेकडून विकसित भारत बनविण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहे. आपला आशीर्वाद हा विकसित भारताची गॅरंटी आहे. ही निवडणूक देशाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. त्यामुळे अर्चना पाटील यांना मतदान करा. तेच मत माझ्या खात्यात येणार आहे. त्यामुळेच देशाला मजबुती मिळणार आहे. जास्तीत जास्त बुथ जिंका आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्चना पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या सभेला मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघातून लाखो नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : बीडमध्ये पंकजा मुंडे, जरांगे पाटील एका मंचावर

व्हाईट हाऊसमध्येही ज्वारीचे श्रीअन्न

धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या ज्वारीला आता श्रीअन्न अशी नवीन ओळख दिली आहे. अमेरिकेतील राष्ट्रपतीच्या व्हाईट हाऊस मध्ये त्यांनी आपल्यासाठी मोठी पार्टी आयोजित केली होती. भारतीय पंतप्रधानासाठी पहिल्यांदाच असे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वपूर्ण आणि मजेशीर गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्या दिवशी रात्रीच्या जेवणात सर्वांसाठी श्रीअन्न म्हणजेच ज्वारीची पदार्थ ठेवले होते. भविष्यात जगातील प्रत्येकाच्या ताटापर्यंत ज्वारी पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले. त्यातून ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dharashiv pm narendra modi appeals to vote archana patil and assures tuljapur railway junction css