धाराशिव: देशातील शिक्षण क्षेत्रात आम्हाला गुंतवणूक करावयाची आहे. तुम्ही बिझनेस पार्टनर व्हा. आम्ही तुमच्या पत्त्यावर डॉलर पाठवले आहेत. परंतु टॅक्ससाठी पैसे पाठवावे लागतील, असे सांगून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाला तब्बल ४६ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. चांगली नोकरी, बागायती शेती असताना शिक्षण क्षेत्रातील बिझनेस पार्टनरचे आमिष शिक्षकाला भोवले आहे. याप्रकरणी धाराशिवच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

धाराशिव तालुक्यातील रूईभर येथील रहिवाशी असलेले किरण विठ्ठल वडवले हे गतवर्षीपासून बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक प्रशालेत शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. त्यांना २८ फेब्रुवारी रोजी रात्री फेसबुकवर एलीझाबेथ जेरॉर्ड या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती मान्य केली. लागलीच त्यांना फेसबुकच्या मेसेंजर अ‍ॅपवर संदेश धडकू लागले. अगोदर वडवले हे काय करतात, त्यांचा मोबाईल क्रमांक, संपूर्ण पत्ता याची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर वडवले यांना संदेश पाठवला की, ‘आम्ही युनायटेड नेशन्ससोबत काम करत असून भारतात शिक्षणावर गुंतवणूक करावयाची आहे. आमच्याकडे भरपूर पैसे आहेत. भारतात गुंतवणुकीच्या भरपूर संधी आहेत. परंतु आम्हाला पैसे गुंतवण्यासाठी भारतीय स्थानिक माणसांची गरज आहे.’ या संदेशावर वडवले यांनी त्यांच्यासोबत शिक्षण क्षेत्रात गुंतवणुकीसाठी काम करण्यासाठी तयार आहे, असे सांगितले. त्यावर त्यांनी मेसेंजरवर एआयआर ईएवाय बिल पाठवून सोबत वडवले यांना डॉलरचा लोखंडी बॉक्स पाठविला असल्याचा फोटो पाठवला. तेंव्हा वडवले यांनी फेसबुकमित्र एलीजाबेथ जेरॉर्डला मेसेंजरवर आपण बिझनेस पार्टनर म्हणून काम करण्याबाबत संमती दर्शवली. त्यांनी ‘आम्ही ३.६ मिलीयन युएस डॉलर बॉक्ससोबत पाठवले आहेत. तुम्ही फक्त पार्सल सोडवून घ्या. त्यासाठी तुम्हाला ६६ हजार रूपये क्लिअरन्स चार्ज लागतील’, असे सांगितले.

हेही वाचा : NEET पेपरफुटीचे धागेदोरे धाराशिवमार्गे दिल्लीपर्यंत, उमरगा येथील एका सरकारी कर्मचार्‍यावर गुन्हा

वडवले यांना पार्सल मुंबई विमानतळावर आल्याबाबत एका महिलेचा फोन आला. त्यासाठी क्लिअरन्स चार्ज आणि टॅक्स म्हणून एक लाख ९६ हजार रूपये महिलेने पाठविलेल्या कॅनरा बँकेच्या एका खात्यामध्ये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर वडवले यांनी मोठ्या विश्वासाने पैसे पाठवले. त्यानंतर पुन्हा मार्च महिन्यात विमा शुल्क २ लाख २० हजार व पुन्हा ४१ लाख ७४ हजार १०० रूपये दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर वडवले यांनी पाठविले. त्यानंतर वडवले यांनी मोबाईलवर फोन करून आजवर ४५ लाख ९० हजार १०० रूपये पाठविल्याबाबत सांगितले. परंतु डॉलर अजून मिळाले नसल्याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी तीन लाख ५७ हजार रूपये भरून घ्या, नंतर डॉलर पाठवले जातील, असे सांगितले. त्याबाबतचा इमेलही वडवले यांना प्राप्त आहे. वडवले यांना शंका येवू लागल्यानंतर १७ जून रोजी त्यांनी मुंबई गाठली. तिथे गेल्यानंतर त्यांनी संपर्कात असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता, त्यांना आज सुट्टी आहे, भेट होणार नाही, असे सांगितले.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: पायाची नस कापून महिला डॉक्टरवर डॉक्टरचा हल्ला; वाळूज परिसरातील घटना

आपली आर्थिक फसवणूक होत असल्याचे शिक्षक किरण वडवले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी २४ जून रोजी थेट सायबर पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरूध्द धाराशिवच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याची टीम करीत आहे.