धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रमुख लढत आहे. महायुतीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर अर्चना पाटील रिंगणात उतरल्या आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर मशाल चिन्ह घेवून निवडणूक लढवत आहेत. आखाड्यात उतरलेल्या एकूण ३१ उमेदवारांपैकी एका अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाले आहे. मतदान यंत्रावरील तुतारी चिन्हामुळे निर्माण होणारा संभ्रम दूर करण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीला पेलावे लागणार आहे.
हेही वाचा: छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह आवारात पोलिसाचा खून; एक गंभीर
सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणुकीच्या आखाड्यात एकूण ३१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. आजवर झालेल्या १७ लोकसभा निवडणुकांपैकी उमेदवारांचीही संख्या सर्वाधिक आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर या दोघांमध्ये प्रमुख लढत असली तरी बहुजन समाज पार्टीचे संजयकुमार वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह उर्वरित २९ उमेदवारांमध्ये होणारी मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार, यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या ३१ उमेदवारांपैकी अपक्ष असलेले योगीराज अनंता तांबे यांना तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी या गावचे योगीराज तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाल्यामुळे निवडणुकीत आणखी रंगत येणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह तुतारी असल्याचा प्रचार सर्वदूर झाला आहे. अपक्ष उमेदवार तांबे यांना तुतारी चिन्ह मिळाल्यामुळे निर्माण झालेला हा संभ्रम दूर करण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीला पेलावे लागणार आहे. तुतारीसह अंगठी, कुकर, वाळूचे घड्याळ, भेंडी, चिमणी, फुलकोबी, पतंग, मोत्याचा हार, हिरा, शिट्टी, अशा अनेक रंजक चिन्हांचाही यावेळी मतदारांना सामना करावा लागणार आहे