जालना : आंतरधर्मीय विवाह केल्याच्या कारणामुळे महिलेस तिच्या तीन वर्षांच्या मुलासह माहेरच्या मंडळींनी दोन महिने साखळदंडाने बांधून घरात डांबून ठेवले होते. पतीने यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतल्यानंतर डांबून ठेवलेल्या आई आणि मुलाची सुटका झाली. जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील एका गावात घडलेली ही घटना आहे.

तालुक्यातील एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये राहात होती. त्यांची मुलगी व शहरातील एका तरुणाची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचेही धर्म वेगळे असले तरी त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला. मुलीच्या या विवाहानंतर तिचे वडील त्यांच्या भोकरदन तालुक्यातील मूळ गावी येऊन राहू लागले. दरम्यान, त्यांची मोठी मुलगी प्रसूत झाली. तिच्या बाळास व बहिणीला बघण्यासाठी तिच्या आईने आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलीला व तिच्या पतीला गावी बोलावून घेतले. घरी आल्यावर मुलीला व तिच्या मुलास घरी ठेवून घेतले. मात्र, जावयास हाकलून दिले. त्यानंतर तरुण पुन्हा ७ डिसेंबर रोजी आपली पत्नी व लहान मुलास आणण्यासाठी सासरवाडीस गेला. मात्र, त्यानंतरही सासरच्यांनी शिवीगाळ करून आणि धमकावून हाकलून दिले. तर आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलीस घरातच साखळदंडाने डांबून ठेवले. या संदर्भातील माहिती तिच्या मोठ्या बहिणीने तरुणास कळवली. त्यामुळे आपली पत्नी आणि मुलाची सुटका करण्यासाठी तरुणाने थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने स्थानिक पोलिसांना कारवाई करून सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पीडित विवाहितेची व तिच्या मुलाची सुटका करून तरुणाच्या स्वाधीन केले. पोलिसांनी पीडितेच्या पायात कुलूपबंद साखळदंड आढळून आल्याचे सांगितले.

Story img Loader