छत्रपती संभाजीनगर : परळी येथील माजलगाव पाटबंधारे विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर याच्याकडील मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी झाडाझडती घेतली असता रोख ११ लाख, ८९ हजार व बिस्किटांसह दीड कोटींचे सोने आढळून आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, हनमान गारे, अमोल खरसाडे यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज येथील युनियन बँक ऑफ इंडियातील लाॅकरची झडती सलगरकर याच्या उपस्थितीत पंचासमक्ष घेतली. यावेळी एकूण २ किलो १०५ ग्रॅम सोने, ज्यामध्ये १ हजार ११४ ग्रॅम वजनाचे सात बिस्किटे व ९९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या एकूण ऐवजाची किंमत अंदाजे १ कोटी ५० लाख रुपये आहे. एकूण १ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली असून ते सर्व जप्त करण्यात आल्याचे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: पन्नास हजारांची मागणी; सहकार अधिकारी सापळ्यात
राजेश सलगरकर याला शेतकऱ्यांकडून गाळ काढून शेतात टाकण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना २२ मे रोजी पकडले होते. माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळीतील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर राजेश सलगरविरुद्ध परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.