नांदेड : लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे मंगळवारी धार्मिक कार्यक्रमातील पालखी निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद घेतलेल्या शेकडो भाविकांना नंतर त्रास जाणवू लागल्याने त्यांना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाप्रसाद घेण्यासाठी सावरगाव, नसरत, रिसनगाव, हरणवाडी, आष्टूरसह गावातील हजारो लोक आले होते. यामध्ये भगर (वरईचा भात) खाल्याने मध्यरात्री दोन वाजल्यापासून हजारो लोकांना उलटी, डोके दुखी, चक्कर येणे असा प्रकार होत असल्याने रात्री दोन पासून रुग्णांना लोहा शहरात शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात झाली होती.
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणांना सतर्क करून मदतकार्यात सहभाग नोंदवला. तसेच एसटी बस बोलावून व खासगी वाहने ट्रॅव्हल्स जीप यामध्ये रुग्णांना बसवून नांदेड, कंधार व अहमदपूर (जि. लातूर), पालम (जि. परभणी) येथे रुग्ण पाठवण्यासाठी सूचना केल्या. याची वरिष्ठांना माहिती देऊन लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांत वाढ करून रुग्णांना अडचण होणार नाही याची दक्षता घेतल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : ‘ब’ मळीपासून इथेनॉल निर्मितीसाठी पवारांचे शहांना पत्र!
विषबाधा झालेले रुग्ण लोहा शहरातील ग्रामीण रुग्णालय व जवळपास पंधरा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यांसह विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाले असून सामान्य जिल्हा रुग्णालयातही जिल्हा शल्यचिकित्सक नीळकंठ भोसेकर यांनी रुग्णांना दाखल करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कोष्टवाडी वाडी व परिसरातील गावातील लोकांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णांना उपचार मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर, डॉक्टर अब्दुल बारी, दीपक मोटे, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, नायब तहसीलदार अशोक मोकळे, बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी राठोड, खासगी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अनिल धुतमल आदींनी पुढाकार घेतला.
हेही वाचा : बीडमधील काही भागात गूढ आवाज; भूकंपाचे सौम्य धक्के, गेवराईजवळ केंद्र
लोकांनी घाबरून जाऊ नये रुग्णालयात उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले. तहसीलदार शंकर लाड यांनी कोष्टवाडी येथे भेट देऊन झालेल्या घटनेची गावकऱ्यांकडून माहिती घेतली व रुग्णांनी घाबरून न जाता रुग्णालयात दाखल होऊन योग्य ते उपचार घ्यावे, असे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निल पत्रेवार, नायब तहसीलदार अशोक मोकळे, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.