परभणी : कापसाचे भाव वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवला खरा, पण शेवटच्या टप्प्यात भावाची फारशी अपेक्षा न बाळगता शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला. जिल्ह्यात यंदा कापसाचे उत्पादन घटल्याचेही स्पष्ट झाले असून ‘सीसीआय’च्या वतीने सात लाख ८६ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खासगी व्यापाऱ्यांमार्फत तीन लाख ३३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असल्याने कापूस उत्पादनात अनेकदा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या जिल्ह्यात यंदा कापसाचे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीच कापसाचा हंगाम संपुष्टात आला आहे. शेवटच्या टप्प्यात बारा रुपये किलो याप्रमाणे अनेक ठिकाणी वेचणीसाठी पैसे द्यावे लागले. अतिवृष्टीचा फटका कापसाला बसल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांनी अनेक महिने घरात कापूस साठवला. कापसाचे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी तो विकला नाही मात्र शेवटपर्यंत कापसाचे दर क्विंटलला सात हजार रुपयांवरच रेंगाळत राहिले. अखेर बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे.

‘सीसीआय’च्या वतीने किमान आधारभूत किमतीने कापसाची खरेदी करण्यात आली असली तरी कापसाच्या आर्द्रतेनुसार प्रतिक्विंटलचे दर निश्चित करण्यात आले होते. सात हजार ते ७ हजार ४०० पर्यंतचे दर सीसीआयने कापसाला दिले तर खाजगी व्यापाऱ्यांनी साडेसहा हजार ते ७ हजार २०० पर्यंत प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला. परभणी जिल्ह्यात ‘सीसीआय’च्या आठ केंद्रांवरील सतरा जिनिंग कारखान्यांमध्ये सात लाख ८६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली तर खासगी व्यापाऱ्यांनी जी खरेदी केली तिचा आकडाही यंदा घटलेलाच आहे. परभणी जिल्ह्यातील ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये तीन लाख ३३ हजार ७७४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. ‘सीसीआय’च्या वतीने तसेच खासगी व्यापाऱ्यांमार्फत जी कापूस खरेदी झाली ती दोन्ही मिळून यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत कमीच आहे.

करोना काळात विक्रमी उत्पादन

करोना काळात अनेक उद्योगांची चाके थांबलेली असताना जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मात्र विक्रमी झाले होते. २०२० चा खरेदीचा हंगाम संपत असताना जी आकडेवारी समोर आली ती अक्षरशः विक्रमी स्वरूपाची होती. करोनापूर्वीची कापूस खरेदी २६ लाख दहा हजार ८८९ क्विंटल तर करोनानंतरची खरेदी १० लाख ६६ हजार ६६६ क्विंटल एवढी आहे. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या वतीने एकूण नऊ लाख ४५ हजार ६६० क्विंटल कापसाची खरेदी झाली. तर सीसीआयच्या वतीने बारा लाख ९३ हजार ४४२ क्विंटल कापसाची खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्यांच्या वतीने झालेल्या कापूस खरेदीचाही आकडा मोठा असून पाच लाख १४ हजार ५२७ क्विंटल कापसाची खरेदी खासगी व्यापाऱ्यांमार्फत झाली आहे. त्या तुलनेत यंदाचे आकडे खूपच कमी आहेत.

Story img Loader