छत्रपती संभाजीनगर : नातेवाईकाकडून आणलेल्या चार वर्षीय मुलीचा छळ करून तिची हत्या केल्याप्रकरणी पती-पत्नीविरोधात गुरुवारी मध्यरात्री सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी आरोपी दाम्पत्य शेख फौजिया शेख फईम (वय ३०) व शेख फईम शेख आयुब (३२, रा. अजिंठा, ह. मु. सिल्लोड) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बाबू सुखदेवराव मुंडे यांनी दिली. परस्परच मृत मुलीचा अंत्यसंस्कार उरकण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर स्वत:हून फिर्याद देत पोलिसांनी शेख दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेतील मृत मुलीचे नाव आयात फहीम शेख असे आहे.

मृत आयातच्या अंगावर ठिकठिकाणी, डोक्यामध्ये चटके दिल्याचे व्रण आढळून आले. तसेच डाव्या पायाचा गुडघा सुजलेला होता. यावरून आयातला अमानुष छळ करून मारल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती असून, यातूनच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.