तुळजापूर : शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या माळेला रविवारी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. दरम्यान तिसर्‍या माळेला शनिवारी रथअलंकार पूजा व रात्री उशिरा संभळाच्या कडकडाटात छबिना मिरवणूक काढण्यात आली. रविवार शाकंभरी नवरात्रातील चौथी माळेनिमित्त रात्री तुळजाभवानीचे चरण तीर्थ झाले. त्यानंतर पहाटे अभिषेक घाट होऊन सिंहासन व अभिषेक पूजा संपन्न झाल्या. यानंतर महंत व भोपे पुजारी यांनी तुळजाभवानीची मुरली अलंकार महापूजा मांडली होती. या पुजेनंतर धुपारती, नैवेद्य, अंगारा हे नित्योपचार विधी पार पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, शाकंभरी यजमान विनोद सोंजी दाम्पत्याने शाकंभरी घटास चौथी पुष्पमाला अर्पण केली व दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘आई राजा उदे-उदे’च्या घोषणा देत शाकंभरी माता की जय, असा जयघोष केला. संध्याकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीचा छबिना काढण्यात आला. या छबिन्याने नवरात्रातील चौथ्या माळेची सांगता झाली. यावेळी महंत, भोपे पुजारी, पाळेकर पुजारी, उपाध्ये, सेवेकरी व मंदिर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : देहविक्रय व्यवसायातील आंतरराष्ट्रीय एजंट महिला पुण्यातून ताब्यात

सोमवार, २२ जानेवारी रोजी शेषशाही अलंकार महापूजा, मंगळवार, २३ जानेवारी रोजी भवानी तलवार विशेष महाअलंकार पूजा तर बुधवार, २४ जानेवारी रोजी महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. दरम्यान नवरात्र काळात देवीची अभिषेक पूजा, कुलधर्म कुलाचार पूजोविधीसाठी व दर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी होऊ लागली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In tuljapur murli alankar mahapuja at tulja bhavani temple on fourth day of shakambhari navratri css
Show comments