भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या गोपीनाथगडाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंडे यांच्या दुसऱ्या जयंतीदिनी १२ डिसेंबरला होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व घटक पक्षांचे प्रमुख नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. एक वीट गोपीनाथगडासाठी या अभियानांतर्गत ५० हजार लोकांचा सहभाग गडाच्या उभारणीत राहिला असून जयंतीदिनी मोठय़ा संख्येने लोक उपस्थित राहण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली.
लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मागच्या वर्षी परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात मुंडे यांच्या स्मरणार्थ भव्य गोपीनाथगडाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडाच्या उभारणीचे भूमिपूजन झाल्यानंतर वर्षभरातच गडाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी मुंडे यांच्या दुसऱ्या जयंतीदिनी गडाचे औपचारिक उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले आहे. यावेळी भाजप महायुतीतील घटक पक्षांचे नेते, शिवसेनेचे नेते, मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यभरातील भाजपचे प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  गोपीनाथगडाची उभारणी लोकसहभागातून व्हावी यासाठी एक वीट गोपीनाथगडासाठी हे अभियान राबवण्यात आले. इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने धनादेशाद्वारे आपली मदत जमा केली आहे. जवळपास ५० हजार लोकांनी आपला सहभाग नोंदवला असल्याने अशा पद्धतीने एखाद्या राजकीय नेत्याचे स्मारक उभे राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या दुसऱ्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जिल्हा भाजपनेही मोठय़ा संख्येने गोपीनाथगडाच्या उद्घाटन सोहळ्याला लोकांनी उपस्थित रहावे यासाठी तयारी केली आहे. शुक्रवारी जिल्हा भाजप कार्यालयात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बठक होऊन नियोजन करण्यात आले असून जयंतीदिनी मोठय़ा संख्येने लोक जमतील, अशी माहिती पोकळे यांनी दिली.

Story img Loader