औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या एका ट्रस्टच्या कार्यालयावर मंगळवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले. तर शहरातील एका रुग्णालयाचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची चर्चा होती. दरम्यान, शहरातील एका ट्रस्टवर छापे मारण्यात आल्याच्या वृत्ताला प्राप्तिकर विभागाच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

औरंगाबाद शहरात २२ ऑगस्ट रोजी चार बडय़ा आस्थापनांवर छापे मारण्यात आले होते. बरोबर महिनाभरानंतर पुन्हा प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. मागील महिन्यात ज्या चार संस्थांवर छापे मारण्यात आले होते. यामध्ये देशभरातील जयपूर, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरू, सूरत आदी ठिकाणी तर महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे आदी ठिकाणांचा समावेश होता. यासाठी सुमारे १५० ते १८० जणांच्या अधिकाऱ्यांचे पथक तयार होते.

औरंगाबाद शहरात ८० ते १०० च्या जवळपास अधिकाऱ्यांचे पथक हे औरंगाबादेतच तळ ठोकून होते. यामध्ये काही कोटींची करचुकवेगिरी उघड झाल्याची माहिती होती. तब्बल चार दिवस प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शहरात तळ ठोकून होते. मागील महिन्यात मारलेल्या छाप्यांमध्ये एक बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, एका ऑईल मिलचे मालक व इतर दोन व्यावसायिकांपैकी एक बियाणे उद्योजक होते. या सर्वाच्या कंपनी, संस्थांवर मारलेल्या छाप्यात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. औरंगाबादेत मंगळवारी मारलेल्या छाप्यांमध्ये शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या एका ट्रस्टसह इतर कामकाज पाहणाऱ्या ट्रस्टच्या कार्यालयांवर छापे मारण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.

Story img Loader