तूर डाळ महागली म्हणून राज्यभरात साठेबाजांवर धडाकेबाज कारवाईसत्र सुरू करणाऱ्या सरकारने आता मात्र व्यापाऱ्यांच्या साठा करण्याच्या क्षमतेलाच नव्या आदेशाने ‘शंभर पटींनी’ बळ दिले आहे! नव्या परिपत्रकामुळे पुरवठा विभागाच्या या पुढील कारवायांची हवाच काढून घेण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील घाऊक साठय़ाची मर्यादा आता २ हजार क्विंटलहून २० हजार क्विंटल करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत मराठवाडय़ात १ हजार ३३५ ठिकाणी छापे टाकून मोठय़ा प्रमाणात डाळींसह सोयाबीनचा साठा जप्त केला होता. साठा वाढविण्यास परवानगीचे पत्र सरकारचे उपसचिव स. श्री. सुपे यांच्या सहीने गुरुवारी पुरवठा विभागास प्राप्त झाले. साठय़ाच्या क्षमतेत शंभर पटीने वाढ केल्याने मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या पूर्व सहमतीने डाळी, खाद्यतेल बिया या बाबतच्या १९७७ च्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली. या आदेशानुसार व्यापाऱ्यांकडे साठा करण्याचा परवाना आहे की नाही एवढेच तपासणे शिल्लक उरणार आहे. थेट १०० पटींनी वाढ करण्यात आल्याने साठा अतिरिक्त ठरण्याची शक्यता नजीकच्या काळात असणार नाही. परिपत्रकानुसार महापालिका क्षेत्रातील घाऊक साठय़ाची पूर्वीची २ हजार क्विंटलची मर्यादा २० हजार क्विंटल करण्यात आली. तसेच किरकोळ साठाही २०० वरून २ हजार क्विंटलवर नेण्यात आला. महापालिका क्षेत्र वगळून इतर ठिकाणीही साठा करण्याची क्षमता कमालीची वाढविली आहे. पूर्वी ती ८०० क्विंटल होती, आता ती ८ हजार व किरकोळ व्यापारासाठी शंभर क्विंटल साठा आता २ हजार क्विंटलवर नेण्यात आला आहे.
कारवाईच्या काळातच आदेशाचे पत्र!
व्यापाऱ्यांनो करा साठा, असा संदेश देणारे पत्रक ऐन कारवाईच्या काळात का निघाले, याची चर्चा सुरू झाली असून सरकार व्यापाऱ्यांसमोर नमले असेही सांगितले जात आहे. पुरवठा विभागाकडे पूर्वी साठा करण्यासाठी परवाना मिळत असे. त्याचे अनेक वर्षांपासून नूतनीकरण झाले नसल्याने औरंगाबाद जिल्ह्यात नेमके व्यापारी किती याची आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

Story img Loader