भारत आणि ऑस्टेलिया यांच्यात पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील भारताची कामगिरी अद्याप समाधानकारक झाली आहे. पण या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली. क्रिकेट सामना पाहताना उद्योजक आणि अष्टपैलू क्रिकेटपटू सुहास कुलकर्णी (६०) यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
सुहास कुलकर्णी हे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे आजीव सभासद होते. सहकारी क्रिकेटपटू प्रदीप शिंदे यांच्यासमवेत त्यांनी प्रिंटवेल या उद्योगाची उभारणी केली होती आणि २८ वर्षांत त्यांनी आपला उद्योग नावारूपास आणला होता. शनिवारी सकाळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना पाहात असतानाच सुहास कुलकर्णी यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी सुनीता, एक मुलगा प्रसन्न आणि मुलगी आसावरी असा परिवार आहे.
सुहास कुलकर्णी यांनी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. आंतर औद्योगिक क्रिकेट स्पर्धा त्यांनी अनेक वर्षे गाजवली. वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्यात ते तरबेज होते. आक्रमक फलंदाजीने त्याने अनेक सामने गाजवले आहेत. क्रिकेटशिवाय सुहास कुलकर्णी यांनी औरंगाबाद मुद्रक संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.