छत्रपती संभाजीनगर: श्रीमंतांसाठी जशा शाळा, रुगणालये उघडली गेली. तशी आता श्रीमंतांसाठी स्वतंत्र चित्रपट निर्मिती सुरू झाली आहे. पूर्वी छोट्या शहरातील नायक असू द्या असे लेखकाला सांगितले जायचे. आता फक्त ‘मल्टिप्लेक्स’साठी चित्रपट बनतो आहे. कारण आता संपत्तीचे केंद्रीकरण शहरी भागात झाले आहे. गूळ असेल तिथेच तर मुंगळेही असतील. ते तत्त्व आता चित्रपटांना लागू झालेले दिसते, असे परखड मत लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गुरुवारी त्यांची दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी प्रकट मुलाखत घेतली.

समाज आणि चित्रपटातील संभ्रमित अवस्थेबाबत बोलताना जावेद अख्तर म्हणाले, ‘समांतर मूल्य आणि आशाआकांक्षा या दोन्ही समोर एक वळण आले आहे. पुढचे काही न दिसणारे. जिथे चांगले वाईट काही कळत नाही. बाजारपेठ आणि उदारीकरण यातून जाताना आपण हा शब्द आता मी बनतो आहे. कारण बाजारातील भांडवलही काम करत असते. येथे आपण स्वत: काय करतो आणि समाजासाठी काय करतो आहोत हेच कळनासे झाले आहे. भांडवली बाजारपेठेचा अजेंडा काम करत असतो. पण अशा काळात लोक फायद्याचा विचार करत राहतात. पण अशा स्थितीमध्येही दु:खी होऊन चालणार नाही. या देशावर औरंजेबाने ५१ वर्षे राज्य केले. पण हा देश हिंदुस्थानच राहिला. कारण जसे गंगा-जमुनेचे असते त्याच्या पृष्ठभागावरचे पाणी दिसते. पण एक न दिसणारा सरस्वतीचा प्रवाह आतून जात असतो. सहा हजार वर्षांची या देशाची सांस्कृतिक वीण लगेच बदलणारी नाही. तीन सभा, चार माणसांच्या वागण्याने  त्यात फार फरक पडणार नाही. ती सांस्कृतिक वीण तो इतिहास हाच आपला आणि आपल्या देशाचा ‘आत्मा’  आहे. त्यामुळे संभ्रमित अवस्थेतील गोष्ट पुढे नेताना चित्रपटांमध्ये जसा नायक सापडत नाही तसेच खलनायकही सापडत नाही.

हेही वाचा >>> “८५ वर्षांच्या लोकांनी…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “माझ्या ३०-३५ वर्षांच्या…”

ना नायक ना खलनायक; स्त्री व्यक्तिरेखाही धुसर

देशातील चित्रपट बनविणाऱ्यांचा बुद्ध्यांक कदाचित एक अंकी असेल. पण १९६० च्या दशकातील नायक हा कोठे तरी नोकरी करणारा, मजूर, प्राध्यापक, डॉक्टर असा काम करणारा माणूस होता. आताच्या नायकाला स्वत: चे विशेषाधिकार असतात. देशातील कोणत्याही सामाजिक प्रश्नाशी त्याचे काही देणे- घेणे असत नाही. तो स्वित्झरलंडमध्ये जगतो. शहरी  भागात वाढतो, त्याच्यासमोर कोणतेही प्रश्न नसतात. त्यामुळे तो काही कामबीम करत नाही. तो आपल्याशी नातेच सांगत नाही. कारण जसे श्रीमंतांसाठी हॉटेल आहेत, रुग्णालये आहेत. तसाच आताचा चित्रपटही श्रीमंताचा झाला आहे. खरेतर व्यावसायिक चित्रपट समाजाचे एकात्म चित्र असते. त्यामुळेच व्यावसायिक चित्रपट मोठा व्यवसाय करतात. त्यामुळे समाजातील अस्वस्थता आता चित्रपटात दिसून येत नाही. १९४०-५० च्या काळातील जमीनदार-ठाकूर आता चित्रपटांमध्ये दिसत नाहीत. त्या पुढच्या काळात शहरीकरणातून आलेला झोपडपट्टी दादा चित्रपटांमध्ये आला. तो पुढे नायकही बनला. पुढे तो भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात लढला. पुढच्या काळात भ्रष्टचार, अन्याय हे खलनायक होते. काही दिवस चित्रपटांनी पाकिस्तानाही खलनायक करून पाहिले. आता तोही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे चित्रपटांना आता खलनायकही उरलेला नाही. त्यामुळे मूल्य, आशा निर्माण करणार जसा नायक नाही तसेच आताच्या चित्रपटांमध्ये खलनायकही उरलेला नाही. परिणामी नाच-गाणी असा काही आशय नसणारा चित्रपट उभा राहतो आहे.

कवितेला भांडवल लागत नाही. चित्रपटांना ते लागते. जिथे भांडवल लागते तिथे त्याच्या मागण्याही असतात आणि भांडवली अर्थव्यवस्थेच्या मागण्याही असतात. त्यामुळे चित्रपटांमध्ये लिहिलेले गीत हे त्या पात्रांचे किंवा त्या चित्रपट समूहाचे असते. शायरी आणि कवी म्हणून लिहिलेली बाब वेगळी आणि चित्रपटात जसा नायक- नायिका जशी भूमिका वठवतात तसेच गीतकारही भूमिका वठवत असतात, असे मत जावेद अख्तर यांनी मांडले.

भाषेत नवे शब्द आले तरच ती वाढेल  

अनेक शब्द भाषेत मिसळून गेले तरच ती भाषा वाढते. अनेक फारसी, हिंदी, उर्दू, इटाली, इंग्रजी, पर्शियन शब्दांना आपण हिंदीचे व्याकरण लावले आहे.  इंग्रजी गरजेची आहेच. पण प्रादेशिक भाषा आपण शिकवतच नाही. मातृभाषा आता झोपडपट्टीत गेली आहे. त्यावर तसेच संस्कार झाले आहेत. त्यामुळे प्रादेशिक भाषाच बदलली आहे. माध्यमांमधून येणारी भाषा ही अशीच दीन झाली आहे. त्याचे पडसाद आता सर्व समाजात दिसतात असे सांगत जावेद अख्तर यांनी दिल्ली पोलिसांनी उर्दू शब्द काढून टाकण्याच्या परिपत्रकावर टीका केली.